no images were found
अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या निर्णयाचे स्वागत-हेमंत पाटील : प्रलंबित अपीलांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी
पुणे,:राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या सुमारे ६६ हजार द्वितीय अपीलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये तीन अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल असल्याचे मत त्यांनी बुधवारी (ता.५) व्यक्त केले.
राज्य माहिती आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर अपील आणि तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यात अडचणी येत होत्या.अतिरिक्त माहिती आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रकरणांच्या सुनावणीला गती मिळेल आणि माहिती अधिकार कायद्यावरील तसेच राज्य सरकारच्या पारदर्शक कारभारावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे पाटील म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगत, नव्याने नियुक्त होणाऱ्या आयुक्तांनी प्रलंबित अपीलांचा जलद, निष्पक्ष आणि गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
तसेच, केवळ नवीन पदनिर्मिती करून न थांबता आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यावरही सरकारने लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत लोकशाही हक्क असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य माहिती आयोग अधिक सक्षम आणि कार्यक्षम होणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.