no images were found
स्टार बझार इमारत सील ; न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर कारवाई स्थगित
कोल्हापूर, जिल्ह्यात : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाने घरफाळ्याच्या तब्बल २७ कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी घाटगे पाटील ऑटोमोबाईल्सच्या मिळकतीतील स्टार बझारची इमारत शुक्रवारी दुपारी सील केली. मात्र, सायंकाळी कोल्हापूर सर्किट बेंचकडून सील न करण्याबाबत स्थगिती आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पुढील कारवाई थांबवून इमारतीवरील सील काढले.
महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाकडून थकीत घरफाळा वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली. संबंधित मिळकतीवर सुमारे २७ कोटी रुपयांची घरफाळा थकबाकी असल्याने दुपारी सीलची कारवाई करण्यात आली होती. यानंतर संबंधित मिळकतधारकांनी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता कोल्हापूर सर्किट बेंचकडील स्थगिती आदेश कारवाईच्या ठिकाणी सादर केला. न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत महापालिकेने पुढील कारवाई तात्पुरती स्थगित केली तसेच लावण्यात आलेले सील काढण्यात आले.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार व उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, चारही विभागीय कार्यालयांचे कर अधीक्षक, कनिष्ठ लिपिक तसेच परवाना विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.