Home Uncategorized गुन्हेगारीला खतपाणी घालणारी अंधश्रद्धा कशाला ?

गुन्हेगारीला खतपाणी घालणारी अंधश्रद्धा कशाला ?

2 second read
0
0
7

no images were found

गुन्हेगारीला खतपाणी घालणारी अंधश्रद्धा कशाला ?

अघोरी विचारातून रस्त्यावर लिंबू-मिरची टाकल्याने, करणीमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अघोरी विधी केल्याने शत्रूचा नायनाट होतो किंवा चमत्काराने आजार बरा होतो, अशा समजुती जेव्हा माणसाच्या विवेकावर मात करतात, तेव्हा अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची बाब राहत नाही; ती गुन्हेगारीला खतपाणी घालणारी सामाजिक समस्या बनते. भीती, असहायता आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत विकृत भोंदू बाबा, मांत्रिक आणि फसवे लोक आर्थिक लूट, शारीरिक छळ, लैंगिक अत्याचार आणि अमानुष कृत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना खतपाणी घालतात. त्यामुळे अंधश्रद्धेकडे केवळ चुकीची समजूत म्हणून नव्हे, तर समाजाच्या सुरक्षिततेसमोरील एक गंभीर आव्हान म्हणून पाहण्याची गरज आहे.

स्मशानभूमीच्या परिसरात अघोरी पूजा, नदी घाटावर जादूटोण्याचे विधी, करणी काढण्याच्या नावाखाली उपचार, लिंबू, खिळे, बाहुल्या व इतर वस्तू ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करणे, तसेच चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक अशा विविध घटना मागील काळात समोर आल्या आहेत. या घटना समाजात अजूनही अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर आहेत, याची जाणीव करून देतात.

अंधश्रद्धेचा सर्वात मोठा फटका बसतो तो संकटात सापडलेल्या माणसाला. घरात कोणी गंभीर आजारी पडले, मूल होत नसेल, व्यवसायात नुकसान झाले, मानसिक ताण वाढला किंवा एखादे वैयक्तिक संकट आले की काहीजण वैद्यकीय उपचार, तज्ज्ञांचा सल्ला किंवा कायदेशीर मार्ग सोडून भोंदू बाबा, मांत्रिक आणि अघोरी विधी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. याच क्षणाची वाट हे फसवे लोक पाहत असतात.

अशा प्रकरणांमध्ये आर्थिक नुकसान हा पहिला फटका असतो. हजारो नव्हे तर लाखो रुपये करणी काढणे, खजिना मिळवून देणे, संतानप्राप्ती, व्यवसाय वाढवणे किंवा शत्रूचा बंदोबस्त अशा खोट्या आश्वासनांसाठी उकळले जातात. अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात, आयुष्यभराची बचत गमावतात.

याहून गंभीर बाब म्हणजे शारीरिक आणि मानसिक छळ. झाडफूक, मारहाण, उपाशी ठेवणे, गरम वस्तूंनी चटके देणे, अमानुष विधी करणे, वैद्यकीय उपचार थांबवणे किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार करणे, हे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. काही वेळा योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाचा जीवही धोक्यात येतो.

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवरील अत्याचार ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. चेटकीण, करणी करणारी किंवा अपशकुनी ठरवून महिलांचा सामाजिक बहिष्कार, मारहाण, अपमान आणि छळ केला जातो. काही प्रकरणांमध्ये तथाकथित धार्मिक किंवा गुप्त विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचार केले जातात. भीती, श्रद्धा आणि सामाजिक दबावामुळे अनेक पीडित महिला तक्रार करण्याचे धाडसही करू शकत नाहीत. त्यामुळे अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नसून मानवी हक्कांवरचा गंभीर आघात आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे अधिनियम, २०१३’ लागू केला आहे. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार गुन्हेगाराला ६ महिने ते ७ वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असतो.

या कायद्याचा उद्देश कोणत्याही धर्माचा किंवा श्रद्धेचा विरोध करणे नाही. उलट, श्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक, अमानुष प्रथा, आर्थिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि हिंसाचार रोखणे हा या कायद्याचा गाभा आहे. जिल्हास्तरावर जनजागृती, शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, गावपातळीवर प्रचार आणि सर्व विभागांच्या समन्वयातून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस, समाजकल्याण, शिक्षण आणि माहिती विभाग यांच्या समन्वयातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे. संशयास्पद प्रकारांची माहिती तातडीने प्रशासनाला देणे, गावपातळीवर जागरूकता निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, यावर विशेष भर देण्यात येत आहे.

आज लिंबू-मिरची बदलण्याची नाही, तर विचार बदलण्याची खरी गरज आहे. श्रद्धा वैयक्तिक असू शकते; पण अंधश्रद्धा समाजासाठी घातक असते. आजारासाठी डॉक्टर, मानसिक समस्यांसाठी समुपदेशक, कायदेशीर अडचणींसाठी प्रशासन आणि जीवनातील प्रत्येक प्रश्नासाठी विवेक—हाच खरा मार्ग आहे.

 सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबल भारताला प्रेरणा देत आहे कारण खरी ताकद ही मूल्ये आणि प्रामाणिकपणात असते हे दाखवत आहे

पुष्पा इम्पॉसिबल भारताला प्रेरणा देत आहे कारण खरी ताकद ही मूल्ये आणि प्रामाणिकपणात असते हे…