Home सामाजिक गोकुळ’ वाचविण्यासाठी ८ जुलैला एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन; 

गोकुळ’ वाचविण्यासाठी ८ जुलैला एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन; 

8 second read
0
0
8

no images were found

गोकुळ’ वाचविण्यासाठी ८ जुलैला एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन; 

कोल्हापूर (प्रतिनिधी), : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार चळवळीचे वैभव आणि लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणाऱ्या राजकीय घडामोडी विरोधात आता दूध उत्पादकांमधूनच आवाज उठू लागला आहे. “गोकुळ ही कोणत्याही व्यक्ती, गट किंवा राजकीय पक्षाची मालमत्ता नसून ती लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. त्यामुळे तिची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता अबाधित राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे,” असे ठाम प्रतिपादन करत डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांनी ८ जुलै रोजी गोकुळ चौक कनेरी येथून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एकदिवसीय प्रतीकात्मक आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

    डॉ. येडूरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही दूध संस्थेचे पदाधिकारी किंवा अधिकारी नसून एका सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. बालपणापासून पशुपालन आणि दूध व्यवसायाच्या माध्यमातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला असून, शिक्षणापासून आयुष्याच्या वाटचालीपर्यंत गोकुळच्या सहकाराचा मोठा वाटा राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

     त्यांनी बोलताना, गोकुळ ही केवळ दूध संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा, शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकार चळवळीची ओळख आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दूध बिलावर लाखो कुटुंबांचे संसार चालतात, मुलांचे शिक्षण पूर्ण होते आणि अनेकांची स्वप्ने साकार होतात. त्यामुळे गोकुळची प्रतिमा मलिन होईल, असे कोणतेही राजकारण किंवा आरोप-प्रत्यारोप सहकाराच्या हिताचे नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले राजकीय संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि बदनामीचे वातावरण यामुळे संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम होत असून, त्याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

    देशातील आणि जागतिक स्तरावरील नामांकित दुग्धसंस्थांच्या बरोबरीने गोकुळने वाटचाल करावी, हा प्रत्येक दूध उत्पादकाचा ध्यास आहे. त्यामुळे गोकुळला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम ब्रँड म्हणून उभे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.या पार्श्वभूमीवर होणारे आत्मक्लेश आंदोलन कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेविरोधात नसून केवळ गोकुळच्या हितासाठी आणि सहकाराची परंपरा जपण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

      या आंदोलनातून दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती करून गोकुळच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, वाहतूकदार, कर्मचारी, सहकारी संस्था आणि गोकुळप्रेमींनी राजकारणापलीकडे जाऊन या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. येडूरे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल कोल्हापूर,  : को…