Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘स्क्रुटिनी सेंटर’ सुरू

शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘स्क्रुटिनी सेंटर’ सुरू

12 second read
0
0
11

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘स्क्रुटिनी सेंटर’ सुरू

कोल्हापूर: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी) येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व स्क्रुटिनी सेंटर (Scrutiny Centre) कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State CET Cell) राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज नोंदणी, कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती (Confirmation) तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन या केंद्रामध्ये उपलब्ध करून दिले जात आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करणे अनिवार्य आहे. CAP तसेच संस्थास्तरावरील (Institute Level) प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जाची नोंदणी व पडताळणी आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेची प्रतीक्षा न करता प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्क्रुटिनी सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्जातील त्रुटी दूर करणे, दस्तऐवज पडताळणी, CAP प्रक्रियेतील विविध फेऱ्या (Rounds), पसंतीक्रम (Option Form) भरण्याची पद्धत, गुणवत्ता यादी (Merit List), महाविद्यालय निवड प्रक्रिया तसेच प्रवेश निश्चिती याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या सर्व शंकांचे समाधान तज्ज्ञ प्राध्यापकांकडून केले जात आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वरूप, विविध शाखांची वैशिष्ट्ये, योग्य शाखा निवडीचे निकष, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत झालेले बदल, भविष्यातील रोजगार संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, स्टार्टअप व उद्योजकता, संशोधनाच्या संधी, विविध शिष्यवृत्ती योजना, शासनाच्या आर्थिक सहाय्य योजना तसेच शिवाजी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शुल्क सवलत व मोफत वसतिगृह सुविधेबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.
स्क्रुटिनी सेंटरमध्ये दिवसभर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. प्रवीण प्रभू, डॉ. चेतन आवटी, डॉ. महेश साळुंखे, डॉ. विश्वास पाटील, डॉ. गणेश पाटील तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील सर्व विभागांचे समन्वयक व प्राध्यापक उपस्थित असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शंका दूर करण्यात येत आहेत. या मार्गदर्शन केंद्राला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमांसह कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व अभ्यासक्रमांबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली जात आहे.
विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीस बळी न पडता अधिकृत CAP प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील प्रवेश मार्गदर्शन व स्क्रुटिनी सेंटरला भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्र राज्यातही अधिवक्त्यांवरील हिंसाचाराला दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणावे : आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडले विधेयक

महाराष्ट्र राज्यातही अधिवक्त्यांवरील हिंसाचाराला दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्…