no images were found
ओडिशा सरकारचा इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (आयएचसी) आणि अदाणी सोबत अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी सामंजस्य करार
भुवनेश्वर, : ओडिशा सरकारने गुरुवारी यूएई स्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (आयएचसी) आणि अदाणी समूह यांच्यासोबत 1.10 लाख कोटी रुपयांच्या एकात्मिक (इंटिग्रेटेड) अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MoU) केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प ओडिशाच्या इतिहासातील सर्वात मोठी परदेशी थेट गुंतवणूक (एफडीआय) असून, भारतातील धातू उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठा एफडीआय प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयएचसी आणि इंडस्ट्रियल प्रमोशन अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओडिशा (IPICOL) यांच्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
अदाणी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि आयएचसी समूहातील इंटरनॅशनल रिसोर्सेस होल्डिंग (आयआरएच) या कंपन्या 50:50 भागीदारीत संयुक्त उपक्रम स्थापन करून ओडिशामध्ये हा ग्रीनफिल्ड एकात्मिक अॅल्युमिनियम प्रकल्प उभारणार आहेत. करारानुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक गुंतवणूक दोन्ही भागीदार कंपन्या कर्ज आणि भागभांडवल (इक्विटी) यांच्या माध्यमातून उभारणार आहेत. या प्रकल्पामध्ये दरवर्षी 40 लाख टन क्षमतेचा अॅल्युमिना रिफायनरी प्रकल्प, 20 लाख टन क्षमतेचा अॅल्युमिनियम स्मेल्टर, 4,000 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह वीज प्रकल्प, 10 लाख टन क्षमतेचा डाउनस्ट्रीम मॅन्युफॅक्चरिंग पार्क आणि त्यासाठी आवश्यक इतर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.या प्रकल्पामुळे खाणकाम, अॅल्युमिना प्रक्रिया, अॅल्युमिनियम उत्पादन आणि संबंधित उद्योगांमध्ये सुमारे 53,500 जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वाहतूक आणि निर्यात व्यवस्थेला धामरा बंदर (अदाणी पोर्ट्स अँड एसईझेडची 100 टक्के उपकंपनी) याची मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले की, हा प्रकल्प ओडिशामध्ये औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी मोठी संधी निर्माण करेल. ते म्हणाले, या गुंतवणुकीमुळे ओडिशामध्ये खाणकामापासून अॅल्युमिना प्रक्रिया, अॅल्युमिनियम उत्पादन आणि त्यावरील मूल्यवर्धित उत्पादनांपर्यंत संपूर्ण अॅल्युमिनियम उद्योग साखळी विकसित होईल.”
हा प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात 66,000 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 44,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. प्रकल्पाचे नेमके ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले, तरी उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, अॅल्युमिना रिफायनरी रायगड जिल्ह्यात, तर अॅल्युमिनियम स्मेल्टर सुंदरगड जिल्ह्यात उभारला जाणार आहे.
या प्रसंगी आयएचसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सय्यद बसर शुएब म्हणाले, “ आयआरएचच्या माध्यमातून आम्ही खाण आणि खनिज क्षेत्रात एकात्मिक व्यवसाय उभारत आहोत. उद्योगांच्या विकासाला चालना देण्यासाठी, पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील बदलाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या खनिजांमध्ये गुंतवणूक करत आहोत. अदाणी एंटरप्रायझेससोबतची ही भागीदारी आमच्या धोरणाशी सुसंगत असून, जागतिक दर्जाचा एकात्मिक अॅल्युमिनियम प्रकल्प उभारण्याच्या दोन्ही कंपन्यांच्या समान उद्दिष्टाचे प्रतीक आहे. हा प्रकल्प दीर्घकालीन आर्थिक मूल्य निर्माण करेल.”
अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि अदाणी सिमेंटचे डायरेक्टर करण अदाणी म्हणाले, “ प्रस्तावित प्रकल्पामुळे ओडिशा हे दीर्घकालीन उत्पादन केंद्र म्हणून विकसित होण्यावर कंपनीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अदाणी समूह आणि आयएचसी समूह यांच्यातील प्रस्तावित संयुक्त उपक्रमामुळे आमची भागीदारी आणखी मजबूत होईल. ओडिशा सरकारच्या सहकार्याने आम्ही एकात्मिक अॅल्युमिनियम उद्योग व्यवस्था उभारू, ज्यामुळे रोजगारनिर्मिती होईल, मूल्यवर्धित उत्पादनाला चालना मिळेल आणि भारताची औद्योगिक स्पर्धात्मकता अधिक मजबूत होईल. अदाणी समूहाच्या निवेदनानुसार, या प्रकल्पातील डाउनस्ट्रीम मॅन्युफॅक्चरिंग पार्कमुळे वाहतूक, बांधकाम, वीज, पॅकेजिंग, नवीकरणीय ऊर्जा आणि प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रासाठी आवश्यक घटक तयार करणारे उद्योग आकर्षित होतील. त्यामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) मोठी चालना मिळेल.