no images were found
गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या प्रकरणी कारवाया वाढविण्याचे: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे निर्देश
कोल्हापूर, : गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या आणि संबंधित बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन संशयास्पद बाबींची माहिती टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५ वर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. या बेकायदेशीर कृत्याची अचूक माहिती देणाऱ्या किंवा स्टिंग ऑपरेशनसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना, न्यायालयात खटला दाखल झाल्यावर महाराष्ट्र शासनाकडून रक्कम स्वरूपात बक्षीस दिले जाते. पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसहभागाबरोबरच कठोर कारवायांची आवश्यकता असून, संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्कतेने काम करत कारवाया वाढवाव्यात, असे निर्देश त्यांनी जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सरीता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, इचलकरंजी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, कायदेविषयक सल्लागार ॲड. गौरी पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, गर्भलिंग निदानासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही बाबींना समान महत्त्व आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५ तसेच संबंधित तक्रार नोंदविण्याच्या सुविधांची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून नागरिक निर्भयपणे माहिती देऊ शकतील. कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये विशेष लक्ष ठेवून काम करावे, असे स्पष्ट केले. गुप्त माहितीच्या आधारे छापे, तपासण्या आणि अन्य प्रतिबंधात्मक कारवाया वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील स्त्री-पुरुष जन्म गुणोत्तर अपेक्षेप्रमाणे नसल्याची खंत व्यक्त करत अवैध गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री हा चिंतेचा विषय असल्याचे नमूद करत त्यांनी अशा प्रकारांना कठोर प्रतिबंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत जिल्ह्यातील पीसीपीएनडीटी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ३५३ नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांपैकी २४५ केंद्रे कार्यरत असून त्यापैकी १९४ केंद्रांमध्ये गर्भवती महिलांची तपासणी केली जाते. तसेच विहित कालावधीत गर्भपात करण्याची परवानगी असलेल्या २०२ केंद्रांमध्ये ७९ खाजगी रुग्णालये, ९५ शासकीय रुग्णालये आणि २८ महापालिका क्षेत्रातील केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांची नियमित तसेच अचानक तपासणी करून कायद्याच्या तरतुदींचे पालन होत आहे की नाही याची खात्री करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.