no images were found
महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या ऋषिकेश दौऱ्यामुळे 5 जूनचा जनता दरबार 11 जून रोजी आयोजित
कोल्हापूर, : ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, नवी दिल्ली यांच्या वतीने उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 117 व्या बैठकीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ.रुपाराणी निकम उपस्थित राहण्यासाठी रवाना झाल्या आहेत. देशातील विविध महानगरपालिकेच्या महापौर या बैठकीस उपस्थित राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी सुविधा, शहरी विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच महानगर प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्सचे सचिव मनोज गुप्ता यांनी पाठविलेल्या निमंत्रणानुसार सदर बैठक दि.3 जून 2026 रोजी ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख महानगरांतील महापौर सहभागी होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उत्तम उपक्रमांची देवाणघेवाण तसेच विविध विकासात्मक विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.
महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या या अधिकृत दौऱ्यामुळे दर महिन्याच्या 5 तारखेला आयोजित करण्यात येणारा जनता दरबार यावेळी नियोजित तारखेला होऊ शकणार नाही. त्यामुळे जून महिन्यातील जनता दरबार गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
जनता दरबारामध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना व विविध नागरी विषय थेट महापौरांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे सर्व नागरिकांनी जनता दरबाराची सुधारित तारीख लक्षात घेऊन दिनांक 11 जून 2026 रोजी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.