no images were found
कसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.4 (छ.ताराराणी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज कसबा बावडा मेनरोड ते प्रिन्स शिवाजी विद्यालय या परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 7 स्टॅण्डबोर्ड, 1 लोखंडी पाईप, 1 वॉटर कुलर, 1 छपरी, 5 बोर्ड व 1 पार्किंग जाळी जप्त करण्यात आली. महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र.4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.