no images were found
डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड
कसबा बावडा (प्रतिनिधी):येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर २०२६’ म्हणून निवड झाली आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॅलिटेक्निकमधून असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.
यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेताना एवढ्या कमी वयात ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर’ म्हणून योगेशने मिळवलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे सांगून योगेशच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबध्द असल्याचे नमूद केले.
प्राचार्य डॉ.नरके यांनी हा सन्मान पॉलिटेक्निकसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.योगेश हा मूळचा माळशिरस येथील असून सध्या पॉलिटेक्निकच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
त्याने गुगलकडे याबाबत ऑनलाईन रजिस्टर केले होते. ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑनलाइन इंटरव्ह्यू, विषयाचे ऑनलाईन प्रेझेन्टेशन या सर्व गोष्टी त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. येणाऱ्या वर्षभरात तो इतर विद्यार्थ्यांना गुगल जेमिनी एआय बाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे.
आईवडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण दिल्याने काहीतरी वेगळे करावे अशी इच्छा होती. यातूनच हे यश मिळाल्याचे योगेशने सांगितले.यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. प्रकाश शिंदे, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, सत्यजित रोकडे आदी उपस्थित होते.