no images were found
एसओएफ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड २०२५-२६ मध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
कोल्हापूर, : शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या (SOF) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदाच्या परीक्षांमध्ये ७२ देशांतील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता.
इचलकरंजी येथील डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी दिया भाऊसाहेब पाटील याने इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड (IEO) मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळवले आहे. तसेच आर.एस.ई.एम.एस. ग्लोबल स्कूलचा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी पार्थ ए. साळुंखे याने नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड (NSO) मध्ये आंतरराष्ट्रीय रँक पटकावला आहे. जयसिंगपूर येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी भाबिरे ध्रुव संदीप याने इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये आंतरराष्ट्रीय रँक मिळवत विशेष कामगिरी केली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनचे संस्थापक व संचालक महाबीर सिंग म्हणाले, “SOF ऑलिम्पियाड २०२५-२६ विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी आणि तार्किक विचारसरणी विकसित करण्यासाठी प्रेरित करत आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी ही त्यांची मेहनत, समर्पण तसेच शाळांकडून मिळालेल्या सक्षम शैक्षणिक पायाचे प्रतीक आहे. आम्ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन (SOF) ही शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. संस्था इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड आणि इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपली बौद्धिक क्षमता, विश्लेषणात्मक विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये सिद्ध करण्याची संधी मिळते.