Home Uncategorized समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

4 second read
0
0
44

no images were found

राजा राममोहन रॉय जयंती विशेष लेख

समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

राजा राममोहन रॉय हे भारतीय पुनर्जागरणाचे अग्रदूत मानले जातात. आधुनिक भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारणांचा पाया घालणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाची जयंती म्हणजे समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस होय.एकोणिसाव्या शतकात त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाज सुधारणांसाठी केलेले प्रयत्न,त्यासाठी उभारलेला सनदशीर लढा आणि कायद्याची मदत घेऊन केलेल्या समाजसुधारणा आजही प्रेरणादायी आहेत.

त्यांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या संक्रमणकाळात भारतीय समाजाला नव्या विचारांची दिशा दिली. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजात आधुनिकतेची पहाट उगवली. राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे झाला. त्यांचे वडील रामकांत रॉय आणि आई तारिणी देवी हे धार्मिक वृत्तीचे होते. बालपणापासूनच त्यांना संस्कृत, फारसी, अरबी, बंगाली आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान प्राप्त झाले. विविध धर्मग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. वेद, उपनिषदे, कुराण आणि बायबल यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी मानवतेचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला.त्यांचा उत्कर्ष हा भारतातील सामाजिक आणि वैचारिक संक्रमणाच्या काळात झाला.

त्या काळात भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. इंग्रजांचे राजकीय वर्चस्व वाढत असताना भारतीय समाज मात्र अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि कालबाह्य चालीरीतींमध्ये अडकलेला होता. स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. सतीप्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व, स्त्रीशिक्षणावरील बंदी, विधवांचा होणारा छळ, जातिभेद आणि अस्पृश्यता या सामाजिक विकृतींनी समाज पोखरला होता. धर्माच्या नावाखाली कर्मकांडांना अधिक महत्त्व आले होते. समाजात विवेकापेक्षा अंधश्रद्धेचे वर्चस्व वाढले होते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठवला. विशेषतः सतीप्रथेच्या विरोधातील त्यांचा लढा ऐतिहासिक मानला जातो. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला जिवंत जाळण्याची अमानवी प्रथा त्यांनी मानवतेविरुद्धचा अपराध असल्याचे ठामपणे मांडले. त्यांनी अनेक लेख, पुस्तके आणि निवेदने लिहून समाजमत जागृत केले. इंग्रजी सत्ताधाऱ्यांशी पत्रव्यवहार करून त्यांनी सतीप्रथा बंद करण्याची मागणी सातत्याने केली. त्या काळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेन्टींक यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन १८२९ मध्ये सतीप्रथेवर बंदी घालणारा कायदा लागू करण्यात आला. हा भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.

राजा राममोहन रॉय यांनी १८२८ मध्ये “ब्राह्मो समाज” या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून एकेश्वरवाद, सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विवेकनिष्ठ विचार यांचा प्रचार करण्यात आला. त्यांनी मूर्तिपूजा, अंधश्रद्धा आणि अवास्तव कर्मकांडांना विरोध केला. धर्म म्हणजे मानवसेवा आणि नैतिकता हा संदेश त्यांनी दिला.

शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला. इंग्रजी शिक्षण, विज्ञान आणि गणित या विषयांच्या अभ्यासाला त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय युवकांनी आधुनिक ज्ञान मिळवावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी हिंदू कॉलेज स्थापनेतही पुढाकार घेतला. बंगाली भाषेत अनेक ग्रंथ प्रकाशित करून त्यांनी समाजप्रबोधन केले.

    “संवाद कौमुदी आणि “मिरात-उल-अखबार”यांसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती केली. भारतीय पत्रकारितेचे जनक म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो.समाजसुधारणेच्या कार्यात त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला. सनातनी मंडळींनी त्यांच्यावर टीका केली. धर्मविरोधी, परंपराविरोधी अशी त्यांची बदनामी करण्यात आली. काहींनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांनी विवेक, तर्क आणि मानवतेच्या आधारावर आपले कार्य अखंड सुरू ठेवले. समाजहितासाठी संघर्ष करण्याची त्यांची वृत्ती अत्यंत प्रेरणादायी होती.

राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंडमधील सत्ताधाऱ्यांशी आणि विचारवंतांशीही पत्रव्यवहार केला. भारतीय समाजातील परिस्थिती, शिक्षणाची गरज आणि सुधारणांचे महत्त्व त्यांनी ब्रिटिश प्रशासनाला पटवून दिले. भारतात आधुनिक शिक्षणपद्धती सुरू व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. प्रेसवरील निर्बंधांविरोधात त्यांनी आवाज उठवला.

सन १८३० मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी भारतीयांच्या प्रश्नांबाबत भूमिका मांडली. इंग्लंडमधील अनेक विद्वानांनी त्यांच्या विचारांचे स्वागत केले. २७ सप्टेंबर १८३३ रोजी ब्रिस्टलजवळील स्टेपलटन येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने भारताने एक महान समाजसुधारक गमावला; मात्र त्यांनी पेटवलेला समाजप्रबोधनाचा दीप आजही तेवता आहे.

राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव भारतातील अनेक समाजसुधारकांवर पडला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक केली.

महाराष्ट्र अशा सामाजिक सुधारणांच्या कायम पाठीशी राहिले आहे.राजा राममोहन रॉय यांच्या विविध चळवळीचे, उपक्रमाचे, समाजसुधारणांचे महाराष्ट्राला कायम आकर्षण राहिले असून महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरणा मिळाली आहे. आज महाराष्ट्र शासनही महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक न्याय यासाठी विविध योजना राबवत आहे. महिला व बालविकास विभागामार्फत महिलांच्या सुरक्षिततेसाठी, स्वावलंबनासाठी आणि आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, महिला बचतगटांचे सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध, महिला अत्याचार प्रतिबंध, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना शासनाने स्वीकारल्या आहेत. “बेटी बचाओ, बेटी पढाओ”, महिला स्वयंसहाय्यता गट, कौशल्य विकास कार्यक्रम, तसेच डिजिटल शिक्षण यांसारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे व त्या माध्यमातून आर्थिक सुधारणांचे नवे दालन राज्य शासनाने उघडले आहे.

सामाजिक सुधारणा ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. राजा राममोहन रॉय यांनी दिलेला विवेक, समानता आणि मानवतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सामाजिक समतेचा, स्त्री-सन्मानाचा आणि प्रबोधनाचा विचार पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे. हेच त्यांना त्यांच्या जयंती दिनाला खरे अभिवादन ठरेल.

-प्रवीण टाके,उपसंचालक,विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर 9702858777

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झा…