no images were found
विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विभागीय माहिती कार्यालयाकडे शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर एका शानदार वातावरणात विभागीय माहिती कार्यालयात पार पडला.
28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाने आयोजन केले आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये विभागीय माहिती कार्यालयाने उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. आज एका शानदार कार्यक्रमात मराठी भाषा अभ्यासक प्रा.डॉ. अरुण शिंदे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार समीर देशपांडे, उर्दू व इंग्रजी भाषा अभ्यासक इनायत अली शेख, उपसंचालक प्रवीण टाके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी हिंद -दी -चादर श्री गुरुतेग बहादुर साहेब जी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धी विषयक उत्कृष्ट कामाबद्दल सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती अधिकारी फारुक बागवान, तसेच लघुलेखक वृषाली कदम यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.