Home उद्योग तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री 

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री 

12 second read
0
0
19

no images were found

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री 

मुंबई, : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी यांच्यासह जपानचे शासन, विधिमंडळ, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग आदी विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन व्यवसायाची राजधानी आहे. ‘सिस्टर स्टेट’ असलेल्या महाराष्ट्राचे आणि वाकायामा प्रांताचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता आणि 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

        दोन वेळा झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगून कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 2023 मध्ये वाकायामाचे दिवंगत राज्यपाल यांच्या उपस्थितीत सुमो पहेलवानांचा संघ मुंबईत आला होता. गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुमो आणि भारतीय कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची आठवण त्यांनी सांगितली. सध्या जपानचे सुमो पहेलवान पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. या क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

        जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांनी भारताशी मैत्री अधिक दृढ केली. त्यांच्या कार्यकाळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले. मुंबईत 40 कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो, 22 कि.मी. लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …