Home शैक्षणिक विद्यापीठस्तरीय रँकिंगमध्ये रसायनशास्त्र, अर्थशास्त्र अधिविभाग सर्वोत्कृष्ट:कामगिरीत सातत्य राखावे: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

विद्यापीठस्तरीय रँकिंगमध्ये रसायनशास्त्र, अर्थशास्त्र अधिविभाग सर्वोत्कृष्ट:कामगिरीत सातत्य राखावे: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

3 second read
0
0
29

no images were found

विद्यापीठस्तरीय रँकिंगमध्ये रसायनशास्त्र, अर्थशास्त्र अधिविभाग सर्वोत्कृष्ट:कामगिरीत सातत्य राखावे: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : अधिविभागांच्या शैक्षणिक आणि संशोधकीय कामगिरीवरच समग्र विद्यापीठाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात असते. शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागांनी ‘विद्यापीठ अधिविभागीय रॅंकिंग फ्रेमवर्क’मध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले असून यापुढील काळात ही कामगिरी सातत्याने उंचावत राहण्यासाठी विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शनिवारी (दि. ३१) येथे केले.

महाराष्ट्र शासनाने, राज्यातील अकृषि सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठांतील विविध अधिविभागांकडून संशोधनाला चालना देणे, उपलब्ध संसाधनांचा पुरेपुर कार्यक्षम वापर करणे, कार्यपद्धतीत पारदर्शकता आणणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे यासाठी विद्यापीठांतर्गत विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम दरवर्षी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत सर्व अधिविभाग, अध्यासने आणि केंद्र यांची १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात आली होती. शनिवारी त्या तपासणीचा निकाल जाहीर करण्यात आला.

विद्यापीठामध्ये राबविण्यात आलेल्या या अधिविभागनिहाय क्रमवारी मानांकनामध्ये (यू.डी.आर.एफ.) रसायनशास्त्र अधिविभाग आणि अर्थशास्त्र अधिविभाग यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले.

सदर उपक्रमांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानवविज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा यांच्याअंतर्गत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अधिविभागांना अनुक्रमे रुपये दहा लाख व पाच लाख आणि अध्यासने आणि केंद्रांच्या गटामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्यांना अनुक्रमे रुपये दोन लाख व एक लाख तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह अशा पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत रसायानशास्त्र अधिविभागाने प्रथम, तर नॅनो विज्ञान आणि बायोटेक्नोलॉजी अधिविभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. इतर विद्याशाखांच्या गटात अर्थशास्त्र अधिविभागाने प्रथम आणि शिक्षणशास्त्र अधिविभागाने द्वितीय क्रमांक मिळविला. अध्यासने व केंद्र या गटामध्ये विद्यापीठ वैज्ञानिक उपकरण केंद्राने (युसिक) प्रथम आणि शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 

या सर्व मानांकनप्राप्त अधिविभाग व केंद्रांना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आणि  प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके वितरित करण्यात आली.

 

‘समाजोपयोगी संशोधनावर रसायनशास्त्र अधिविभागाचा भर’

रसायनशास्त्र अधिविभागाने संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यावर विभागाने सातत्याने भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत रसायनशास्त्र विभागाला संशोधनासाठी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला. या निधीच्या माध्यमातून स्मार्ट व प्रकाशोत्सर्जक पदार्थ, कॅन्सरवरील संशोधन, ऊर्जा साठवणुकीसाठी सुपर कॅपेसिटर बॅटरी, विविध प्रकारचे सेन्सर तसेच औद्योगिक वापरासाठी उपयुक्त रसायनांच्या निर्मितीवर महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आले. विभागाने एकूण ४० समाजोपयोगी पेटंट्स प्राप्त केली असून त्यामध्ये भारतीय, जर्मन तसेच युनायटेड किंगडम (यूके) येथील पेटंट्सचा समावेश आहे. या पेटंट्समुळे विभागाच्या संशोधन कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. युडीआरएफमधील मानांकनामुळे अधिविभागाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया अधिविभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…