Home सामाजिक “बोलीभाषांविषयी सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज”

“बोलीभाषांविषयी सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज”

27 second read
0
0
24

no images were found

“बोलीभाषांविषयी सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज”

कोल्हापूर,(प्रतिनिधी): बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये उमटला.महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत ‘बोलींचा जागर’ ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत ‘बोलींचा जागर’ ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा आणि चंदगडी लोकगीतांचे सादरीकरण झाले.

        मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत आणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. गोपाळ गावडे आणि डॉ. एकनाथ आळवेकर या तज्ज्ञांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉ. संजय पवार प्रमुख उपस्थित होते.

         यावेळी ‘चंदगडी बोली: उद्गम आणि विकास’ या विषयावर बोलताना डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, बोलीभाषेचा न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनात शालेय शिक्षणापासूनच निर्माण केला जातो आणि त्यातूनच पुढे भाषिक सपाटीकरणाच्या प्रक्रियेला सुरवात होते. या पेरलेल्या न्यूनगंडातून आजवर अनेक बोलीभाषा अस्तंगत झाल्या, तथापि आता त्यांच्या जतनासाठी शासनाने पुढाकार घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. बोलीभाषा ही आपल्या अस्तित्वाचे कारण आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन बोलीभाषेविषयी, प्रेम, आदर आणि सद्भाव जागृत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीने ज्या त्या भागातील बोलीभाषेविषयी त्या भागांत संबंधित बोलीभाषेचा उत्सव साजरा केला जावा. त्यासाठी शासन आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

        ‘चंदगडी बोलीचे स्वरुप’ या विषयावर बोलताना डॉ. गोपाळ गावडे म्हणाले, चंदगड हे ठिकाण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे पूर्वेकडील चंदगडी बोलीवर कानडी आणि बेळगावी मराठीचा प्रभाव दिसतो तर पश्चिमेकडील बोलीवर गोमंतकीय कोकणीचा प्रभाव दिसतो. चंदगडी माणूस हा निर्मळ, स्वाभिमानी आणि सडेतोड स्वभावाचा असल्यामुळे स्वाभाविकच त्याची भाषा ही राकट आहे. या भाषेत लिंगभेद आढळत नाही. प्रत्येक विधी, सण, उत्सव यांचे लोकगीतांतून मोठे साजरीकरण होते. आता नव्या पिढीमध्ये हे सारे अस्तंगत होताना दिसते. जर ही बोलीभाषा टिकवावयाची तर तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

डॉ. एकनाथ आळवेकर ‘कोल्हापुरी बोली’ या विषयावर बोलताना म्हणाले, कोल्हापुरी बोली ही कृषी आणि ग्रामीण संस्कृतीमधून उदयाला आलेली आहे. करवीर, पन्हाळा, कागल, भुदरगड, शाहूवाडी, शिरोळ आणि गगनबावडा व कर्नाटकचा सीमाभाग या ठिकाणी प्रामुख्याने ती बोलली जाते. इथला भूमीपुत्र रांगडा आहे. त्याच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या बोलीमध्ये आढळते. एकाचवेळी रांगडा लवंगी मिरचीसारखा तिखट शिवराळपणा आणि गुळासारखा गोडवा हे त्याच्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. शंकर पाटील, महादेव मोरे, डॉ. आनंद यादव, डॉ. राजन गवस, डॉ. चंद्रकुमार नलगे, कृष्णात खोत आणि किरण गुरव इत्यादी लेखकांच्या साहित्यामधून कोल्हापुरी बोली निरनिराळ्या ढंगाने वाचकांना सामोरी येते. उच्चारणातील आक्रमकता, स्त्रियांच्या बोलण्यातील क्रियापदांचा वापर आणि कृषीसंस्कृतीचा स्वाभाविक प्रभाव ही या बोलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये इंग्रजी शब्दांचे सुलभीकरण करून त्यांचा सहजगत्या नित्य बोलण्यात केला जाणारा वापर हेही कोल्हापुरी बोलीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणून सांगता येते.

       सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणांतून कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींमधील शब्द, वाक्प्रचार आणि म्हणींची अनेक उदाहरणे देऊन ही माहिती रंजकरित्या सादर केली.

यावेळी मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉ. संजय पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बोली भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचप्रमाणे विविध बोलीभाषांचे शब्दकोष निर्माण करण्याच्या दृष्टीनेही शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करीत आहे. नवतंत्रज्ञानाचा, समाजमाध्यमांचा वापर करून नव्या पिढीने आपल्या बोली भाषेला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

       अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, बोलीभाषा ही आपली खरी मातृभाषा आहे, हे लक्षात घेऊन आपण तिचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. भाषा हे लोकांमध्ये जवळीक साधण्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे. भाषा प्रवाही राहण्यासाठी अन्य भाषांतील शब्दांचा मुक्तप्रवेश आपण स्वीकारला पाहिजे. बोलीभाषांचे शब्दकोष निर्माण होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चंदगडी लोककलाकारांचे श्रवणीय सादरीकरण

कार्यक्रमात डॉ. गोपाळ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनवाडी (ता. चंदगड) येथील तुळसाबाई बांदिवडेकर आणि सहकारी लोककलाकारांनी चंदगडी लोकगीतांचे सादरीकरण केले. विशेषतः चंदगड भागातील विवाहादरम्यान जे विविध विधी केले जातात, त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या विविध लोकगीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कलाकारांत सरिता विष्णू गावडे, सुनिता गोविंद भादवणकर, गुंडाबाई बाळू गावडे, शांता महादेव बांदिवडेकर, अनिता अनंत गावडे, सुनिता गावडे आणि शांता दत्तू गावडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे भाषा अधिकारी डॉ. अजित पवार, वरिष्ठ अनुवादक मुकुंद गोरे, अधीक्षक नारायण जायभाये, नितीन यशवंतराव, डॉ. अनिल गवळी, डॉ. अरुण शिंदे, डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. प्रांजल क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…