no images were found
‘इत्ती सी खुशी’ मालिकेतील अन्विताच्या हृदयस्पर्शी कौटुंबिक संघर्षात सुम्बुल तौकीर खानच्या संघर्षाचे प्रतिबिंब दिसते
सोनी सबवर लवकरच ‘इत्ती सी खुशी’ मालिका सुरू होणार आहे, पण त्या अगोदरच मालिकेचे हृदयस्पर्शी कथानक आणि अन्विता दिवेकर या केंद्रवर्ती व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुम्बुल तौकीर खानने साकारलेली अन्विता ही एक धडाडीची तरुणी आहे, जी स्वतःच्या खंबीर खांद्यावर आपल्या कुटुंबाचा भार वाहत आहे. सुम्बुल एक ताकदीची अभिनेत्री आहे, त्यामुळे तिने साकारलेली अन्विता प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल आणि या गोष्टीचे स्मरण देईल की अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या कुटुंबाला एकसंध ठेवतात.
अन्विता एक काल्पनिक व्यक्तिरेखा असली, तरी ती खूप जिवंत, हाडामासाची व्यक्तिरेखा आहे. आणि सुम्बुलच्या जीवनाशी तिचे बरेच साधर्म्य आहे. या मालिकेत अन्विता सहा भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. आई सोडून गेल्यावर आणि वडील व्यसनाधीन झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आहे. आपल्या भावंडांना काही कमी पडू नये म्हणून तिने आपले तारुण्य, आपली स्वप्ने, स्वतःचे सुख दूर सारले आहे. पडद्याच्या मागे सुम्बुल तौकीर खानच्या कहाणीतील परिस्थिती वेगळी असली, तरी जबाबदारीची जाणीव, भावनिक परिपक्वता आणि मूक चिवटपणा अन्विताप्रमाणेच आहे.
सुम्बुलसाठी अन्विताची व्यक्तिरेखा साकारणे हा एक अत्यंत भावनिक आणि वैयक्तिक अनुभव आहे. या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात तिच्या स्वतःच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे ही भूमिका तिच्या अंतःकरणाच्या खूप जवळची आहे. अन्विताची भूमिका करताना आपल्या स्वतःच्या जीवनातील काही क्षण ती पुन्हा अनुभवत आहे. अन्विताचा मूक संघर्ष, समजूतदारपणे उचललेली जबाबदारी आणि संसाराचा गाडा रेटण्यासाठी लागणारी हिंमत ती समजू शकते. लहान वयातच एक आई, संरक्षक आणि प्रदाता बनलेल्या अन्विता प्रमाणे सुम्बुल देखील अकाली प्रौढ आणि समजूतदार झालेली मुलगी आहे. सिंगल पॅरेंटकडे वाढलेल्या सुम्बुलला देखील लवकरच आपल्या जबाबदारीची जाणीव झाली आणि आपल्या वडिलांना आणि लहान बहिणीला आधार द्यावा लागला.
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विताची भूमिका साकारण्याबाबत सुम्बुल तौकीर खान म्हणते, “अन्विता ज्या समजूतदारपणे आपल्या कुटुंबाचे दुःख सोसते, कुटुंबाला ओझे न मानता आपली जबाबदारी मानते, त्याच्याशी मला स्वतःचे साम्य दिसते. ही अशी भूमिका आहे, जी माझ्यातील कलाकाराला आव्हान देते आणि त्याच बरोबर माझ्या जीवनातील काही तुकडे पडद्यावर साकारण्याची संधीही देते. माझ्या आयुष्यात देखील एक काळ असा होता, जेव्हा जीवन अनिश्चित होते, मी माझ्या वडिलांना, बहिणीला आणि कुटुंबाला चांगले भविष्य मिळावे म्हणून धडपड करत होते. अन्विता प्रमाणे माझाही या गोष्टीवर विश्वास आहे की, चिकाटीमधून ताकद येते आणि हेच तत्वज्ञान मी स्वतःच्या जीवनात रुजवले आहे.”