no images were found
निवृत्त प्राध्यापक एस. आर. यादव यांची इंडियन बॉटनिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक आणि सध्या INSA वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले प्रा. एस.आर. यादव यांची इंडियन बॉटनिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला आहे.
निवृत्त प्राध्यापक एस. आर. यादव यांची अध्यक्षपदी निवड झालेल्या इंडियन बॉटनिकल सोसायटीची स्थापना 1920 मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या नागपूर येथील बैठकीत झाली. १९२१ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातून प्रा. एस. एल. आजरेकर (१९२६), प्रा. एस. पी. आघारकर (१९३३), प्रा. आर. एच. दस्तूर (१९३४), प्रा. टि. एस. महाबळे (१९६८), प्रा. आर. एम. पै (१९९७), प्रा. ए. आर. कुलकर्णी (२०१२) या शास्त्रज्ञ/ प्राध्यापकांची निवड झाली होती. म्हणजे १०२ वर्षात या पदावर केवळ सहा जण हे महाराष्ट्रातील होते.
प्रा. एस. आर. यादव यांची निवड होणे ही बाब महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. प्रा. यादव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पति वर्गीकरणशास्त्र तज्ञ आहेत. आजवर त्यांनी ३०० हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आजवर शेकडो व्याख्याने दिली आहेत. पीएच. डी. साठी एकूण २६ आणि एम. फील. साठी ११ विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. वनस्पतीशास्त्र विभागामध्ये कार्यरत असताना साधारणतः १०कोटीहून अधिक निधी त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आणला. सपूष्प वनस्पतींच्या १० हुन अधिक प्रजातींना सरांचे नाव दिले गेले आहे आणि त्यांनी स्वतः ७५ हुन अधिक वनस्पती शोधून त्याचे नामकरण केले आहे. अनेक संदर्भग्रंथ त्यांनी लिहले आहेत जे विद्यार्थी, वनविभाग आणि समाजाच्या उपयोगासाठी आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले यादव हे पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालय,भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या जानकी अम्मल पुरस्काराचे सुद्धा मानकरी आहेत.