
no images were found
ध्वजदिन निधी 2024 संकलनाचा जिल्ह्यात शुभारंभ
कोल्हापूर, : संस्था व नागरिकांच्या सहकार्यामुळे ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर जिल्ह्याला मागील वर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला असून यावर्षी पहिला क्रमांक मिळण्यासाठी सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीला सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024 संकलन शुभारंभ कार्यक्रम प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे पार पडला. दीप प्रज्वलन व शहिदांना श्रध्दांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ भिमसेन चवदार (निवृत्त), जिल्हा सैनिक मंडळाचे उपाध्यक्ष ले. कर्नल विलास सुळकुडे (निवृत्त), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन उकिर्डे व अजय पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी उपस्थित होते. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रशस्तीपत्रक, धनादेश, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. ध्वजदिन निधी संकलन 2023 करीता स्वच्छेने देणगी, उत्कृष्ट संकलन केलेले विभाग प्रमुख, संस्थांच्या प्रतिनिधींचा प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलनात जिल्ह्याने इष्टांकापेक्षा जास्त निधी संकलन करुन राज्यात तिसरा तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे व डॉ. चवदार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आपल्या कुटुंबीयांपासून दूर जावून देशाच्या रक्षणासाठी सैनिक सदैव तत्पर असतात. यासाठी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रति सर्वांनी नेहमी कृतज्ञ असणे आवश्यक आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी प्रास्ताविकातून मागील वर्षीची उद्दिष्ट पूर्ती व यावर्षीच्या उद्दिष्टा बाबत माहिती देवून ध्वजदिन निधी संकलनाचे महत्व सांगितले. ध्वजदिन 2023 निधी संकलनासाठी 1 कोटी 60 लाख 79 हजार रुपयांचा उदिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद व इतर संस्थांच्या प्रयत्नाने दिलेल्या इष्टांकापेक्षा जास्त म्हणजे 2 कोटी रुपयांचा निधी संकलित करुन जिल्ह्याने 124.38 टक्के उदिष्ट पूर्ती केली आहे.
कार्यक्रमात सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी आभार मानले. यावेळी ध्वजदिन निधी संकलनासाठी योगदान दिलेले विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवृत्त सैन्य अधिकारी, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी व निधी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते.