no images were found
जिल्ह्रयातील दहा मतदार संघात 14 ते 16 नोव्हेंबर पर्यंत होणार गृहमतदान – अमोल येडगे
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार जिल्ह्रयातील दहा मतदार संघात दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांचे 12डी अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या 4 हजार 601 एवढी आहे. यात 85 वर्षावरील 3 हजार 870 मतदार असून 731 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जावून विधानसभा मतदार संघनिहाय दि.14 ते 16 नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी 209 पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्रयातील सर्व विधानसभा मतदार संघातील ज्या 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडून संबंधितांना संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच कळविलेल्या दिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. दोन वेळा अनुपस्थित असलेल्या मतदारांना गृहमतदान करण्याची त्याचबरोबर मतदान केंद्रावर जावून मतदान करण्याची संधी नसेल असेही जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दहा विधानसभा मतदारसंघातील यंत्रणेने नियोजन केले आहे.