no images were found
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून वर्कशॉप विभागाची अचानक पाहणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 6 वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट दिली. यावेळी येथून कचरा संकलन करणा-या 17 ॲटोटिप्पर 6.45 नंतरही बाहेर पडले नसलेचे आढळून आलेने या गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त व मुख्य आरोग्य निरिक्षकांना दिले. तसेच दोन वाहनचालक प्रभागात न जाता हुतात्मा गार्डन येथे रस्त्याकडेला वाहन पार्किंग करुन बसलेचे निदर्शनास आलेने या दोन्ही ड्रायव्हरांचेही एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले.
प्रभागात टिप्पर गाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी प्रशासकांना आल्याने त्यांनी आज सकाळी अचानक वर्कशापची फिरती करुन पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक यांना तातडीने सकाळी 6.30 वाजता वर्कशॉपमध्ये बोलावून घेऊन टिप्परवरील संबंधीत ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सर्व गाडयांचा वेळोवेळी मेन्टनन्स करुन घ्यावा. ॲटो टिप्परवर जे जीपीसी ट्रॅकींग सिस्टिीम आहे त्या सर्व गाडयांच्या रुटची तपासणी करा. ज्या तीन गाडया बंद आहेत त्या तातडीने दुरुस्त करुन सुरु करा. ॲटोटिप्परला डिझेल भरण्यासाठी 7 ते 8 एैवजी सकाळी 5 ते 6 यावेळेत डिझेल भरण्याची व्यवस्था करावी. तसेच सर्व गाडयांचे पंक्चर काढण्यासाठी बाहेर जावे लागते. त्याएैवजी नेमलेल्या एजन्सीने वर्कशॉपमध्ये जागेवरच पंक्चर काढा. त्यामुळे गाडयांचा वेळही वाचेल अशा सूचना वर्कशॉप विभागाला दिल्या.