no images were found
घरगुती गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज
कोल्हापूर :- घरगुती गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या तयारीचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी आढावा घेतला. यावेळी प्रशासकांनी मिरवणूक व मुख्य मार्गावरील रस्ते दोन दिवसात डांबरी पॅचवर्क करणे, विभागीय कार्यालयातील विसर्जन कुंडांची तपासणी व इतर आवश्यक ती साधन सामुग्री तयार ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, नेहा आकोडे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, आर के पाटील, महादेव फुलारी, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार,वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे, विद्युत अभियंता अमित दळवी उपस्थित होते.
महापालिकेच्यावतीने विसर्जनाच्या कामकाजासाठी अधिकाऱ्यांसह अधीक्षक, सहा.अधिक्षक व लिपीक संवर्गातील 500 कर्मचा–यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर के.एम.टी.कडील 180 कर्मचारी व शिक्षण विभागाकडील 80 कर्मचा-यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. इराणी खण येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र मंगळवारी बसविण्यात येणार आहे. चार विभागीय कार्यालयाअंतर्गत पवडी विभागाचे 500 कर्मचारी, शहरात सर्वत्र आरोग्य विभागाचे 1200 कर्मचारी, गणेश मुर्ती संकलनासाठी 145 टँम्पो 450 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 ॲम्बुलन्स व 7 साधे तराफे व 7 फलोटींगचे तराफे अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. तसेच महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी सर्व साधनसामुग्रीसह तैनात करण्यात येणार असून विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या 12 टिम तयार करण्यात आल्या आहेत. विर्सजनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून नागरीकांचे प्रबोधन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक फलकही लावण्यात येत आहेत. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात सर्व प्रभागात विविध ठिकाणी 198 गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड व मंडळांच्यावतीने काहीलींची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
पवडी विभागाकडून नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये विर्सजन केलेल्या गणेशमुर्ती एकत्र करुन टॅम्पोमधून वाहतूक करुन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच विर्सजन स्थळाजवळील निर्माल्य गोळा करणेचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 12 आरोग्य निरिक्षकांच्या नियंत्राखाली त्या त्या प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रमाणे तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी 1200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी एकटी, संस्थेच्या महिलांच्याकडून निर्माल्याचे विलगीकरण करुन खत निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी अवनी, एकटी व वसुंधरा या संस्थेच्या 150 महिला सदस्या हे काम करणार आहेत. तरी शहरातील नागरिकांनी महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्येच गणेशमुर्ती व निर्माल्य देऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.