no images were found
नॅनो-संमिश्र आधारित सौर-उपकरण, अँटिमायक्रोबियल व गॅस-सेन्सरविषयक संशोधनास तीन पेटंट
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील शिवाजी विद्यापीठातील डॉ. सागर दा. डेळेकर (रसायनशास्त्र अधिविभाग), डॉ. प्रमोद अ. कोयले (स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी), प्रा. विजय घोडके (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी), प्रा. प्रकाश पवार (यशवंतराव पाटील सायन्स महाविद्यालय सोळांकूर), डॉ. प्रशांत पाटील
(तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ) व डॉ. सतीश पाटील (कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) यांनी नॅनो संमिश्रे आधारित सौर उपकरण, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणे तसेच वायू पदार्थ संवेदन (गॅस-सेन्सर) याविषयी सखोल संशोधन केले असून सदर संशोधनासाठी त्यांना २ जर्मन व १ युके पेटंट प्राप्त झाले आहे.
या संदर्भात माहिती देताना डॉ. डेळेकर यांनी सांगितले की, आजच्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्या व सिलिकॉन- आधारित सौर उपकरणाच्या उच्च किमतीच्या संदर्भात, विविध शास्त्रज्ञ सध्या उपयुक्त पर्याय विकसित करण्यासाठी कार्यरत आहेत. सौर ऊर्जेचा वापर करण्याच्या विविध धोरणांपैकी, नॅनोसंमिश्रे आधारित सौर यंत्रणा ही एक उपयोगी व आकर्षक बाब आहे. या संदर्भात संशोधक चमू सौर ऊर्जेच्या रूपांतरणासाठी धातू ऑक्साईड-आधारित नॅनोसंमिश्रे विकसित करण्यासाठी संशोधन करीत आहे. तसेच, दैनंदिन जीवनात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी आदी सूक्ष्म जीवजंतू सर्वत्र आढळतात, जे वातावरणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरण्याचा कारणीभूत ठरतात. असे सूक्ष्म जीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता खूप असते. किंबहुना मधुमेही, बीपी रुग्णांना अशा जीवजंतूचा संसर्ग लवकर होऊन त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते. म्हणून या सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्यासाठी प्रा. डेळेकर व त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रा. व्ही. एस. घोडके यांनी धातू ऑक्साईड नॅनोसंमिश्रे-आधारित प्रतिजैविक घटक बनविले आहेत. ज्याचा उपयोग निश्चित: जीवाणूजन्य संसर्ग व संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. एकंदरीत धातू ऑक्साईड-आधारित नॅनोसंमिश्रे वापरून फक्त ऊर्जा संबंधित नाही, तर वैद्यकीय क्षेत्रातही प्रभावीपणे विकास केला जाऊ शकतो, जे पर्यावरणीय तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून समाजासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर, या चमूने आमोनिया वायू संवेदनासाठी अशाच नॅनो संमिश्रे आधारित नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यास यूके पेटंट मंजूर करण्यात आले आहे. हे प्रगत उपकरण अतिसंवेदनशील आहेत, ज्यामुळे ते अमोनियाच्या अगदी लहान प्रमाणावरही देखरेख प्रभावीपणे ठेवू शकतात. शेती आणि साफसफाईसारख्या उद्योगांमध्ये सुरक्षिततेसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. आजपर्यंत डॉ. डेळेकर यांनी १०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांचे १२ पेटंट मान्य झाले आहेत. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल डॉ. डेळेकर यांच्यासह सर्वच संशोधकांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्यासह सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.