no images were found
अमृत’च्या लक्षित गटातील युवकांना मिळणार एमकेसीएल संस्थेमार्फत संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण
कोल्हापूर : कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळामार्फत लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देण्यात येणार आहे. तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी व उद्योगाभिमुख रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन स्वावलंबनाला चालना देण्यासाठी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी ‘अमृत’आणि एमकेसीएल यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. अमृतच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे.
या करारा अंतर्गत एमकेसीएल मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवड झाल्यावर लाभ देण्यात येईल. ‘अमृत’ तर्फे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या युवकांनी MKCL च्या नियमानुसार सुरुवातीस सुरक्षा शुल्क स्वतः भरावयाचे आहे. योजनेच्या पात्र लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या प्रशिक्षणाचे शैक्षणिक शुल्क अमृत संस्थेमार्फत एमकेसीएल संस्थेस परस्पर दिले जाईल. यासंबंधी सर्व माहिती अमृतच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
या सामंजस्य कराराच्या वेळी एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वीणा कामत, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक अमित रानडे, उप महाव्यवस्थापक डॉ. पाटेकर आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी उदय लोकापल्ली तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश वाघचौरे उपस्थित होते.