no images were found
आमदार ऋतुराज पाटील यांचे अनोखे रक्षाबंधन!
मोरेवाडीतील कॅन्सरमुक्त भगिनीने बांधली राखी, उपचारांसाठी मिळवून दिली ६ लाखांची मदत
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात उपचारांसाठी 6 लाख रुपये उपलब्ध करून देऊन मोरेवाडी येथील भगिनीला कॅन्सरमुक्त करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे. आजारातून बऱ्या झालेल्या भगिनीने आमदार ऋतुराज पाटील यांना राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मोरेवाडी येथील तिरुपती पार्क येथे राहणाऱ्या मंगल सुधाकर कारंडे या गेल्या महिन्यापासून कॅन्सरने आजारी होत्या. किमोथेरपी आणि रेडीएशन ट्रीटमेंटसाठी मोठा खर्च होणार होता. ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी याबाबतची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांना देताच त्यांनी या भगिनीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांनी या भगिनीच्या उपचारासाठी ६ लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यामुळे मंगल कारंडे यांच्यावर वेळेत योग्य उपचार होऊन त्या कॅन्सर मुक्त झाल्या.
आमदार ऋतुराज पाटील मोरेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता मंगल कारंडे यांनी आयोजकांना आमदार पाटील यांनी केलेल्या मदतीची माहिती देत त्यांना राखी बांधण्याची ईच्छा व्यक्त केली. आमदार पाटील यांनीही लगेचच त्याला नम्रपणे होकार दिला. आपण भावाप्रमाणे माझ्या मदतीसाठी धावून आलात. त्यामुळे आज मी आजारमुक्त झाले आहे, अशा भावना व्यक्त करत त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हातावर राखी बांधत कृतज्ञता व्यक्त केली.
मोरेवाडीतील या भगिनीच्या प्रेमाने आमदार ऋतुराज पाटीलही भारावून गेले. आमदार पाटील यांनी कारंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हा भाऊ आपल्या पाठीशी कायम उभा असेल. कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते जपण्याचे कार्य डी. वाय. पाटील कुटुंबीयाकडून यापुढेही आविरतपणे सुरुच राहील अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी मंगल कारंडे यांचे पती सुधाकर कारंडे, मुलगा शुभम कारंडे, सरपंच ए. व्ही. कांबळे, ग्रा. प. सदस्य अमर मोरे, आशिष पाटील, श्रेयस कोरवी, अॅड. अनिल शिंदे, रणवीर पाटील यांच्यासह तिरुपती कला, क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.