no images were found
४१ व्या वर्धापनदिनानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे केंद्र शासनाचे स्किल हब
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये स्किल हबची स्थापना झाली. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांच्या हस्ते स्किल हबचे उद्घाटन झाले. यावेळी व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे, फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर, विभागप्रमुख, आजी-माजी स्टाफ उपस्थित होते. त्याचबरोबर ९ ऑगस्ट १९८३ रोजी न्यू पॉलिटेक्निक या नावाने स्थापन झालेल्या या काॅलेजचा ४१ वा वर्धापन दिन केक कापून व आतषबाजीत उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित न्यू पॉलिटेक्निकच्या माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण अधिक सुसंगत करणे व उद्योगपूरक कुशल मनुष्यबळ निर्माण करणे या उद्देशाने केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत स्किल हब ही योजना आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना डिप्लोमा व डिग्री या मुख्य शिक्षणासोबतच कौशल्याधारित कोर्स करता येईल. नोकरी-व्यवसायासाठी त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल, अशी माहिती एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी निर्माण होत असलेल्या स्किल हब व अनुषंगिक उपक्रमांना संस्थेचे सदैव पाठबळ असेल अशी ग्वाही चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी दिली.
१९८३ साली स्थापनेवेळी न्यू पॉलिटेक्निकसाठी पहिले लेक्चर घेणारे प्रा. बी. डी. शिंदे यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. तीन डिप्लोमा कोर्सेसनी सुरू झालेल्या या काॅलेजमध्ये सद्ध्या सहा डिप्लोमा कोर्सेस, चार डिग्री कोर्सेस, इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, कौशल्य विकास कोर्सेस व अल्पमुदतीचे कोर्सेस उपलब्ध असल्याने १९८३ साली लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील यांनी प्रस्तावना केली. प्रा. वैभव पाटणकर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. प्रा. माधुरी पाटील यांच्या वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.