no images were found
गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा, सुविधा व उपचार द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- 15 व्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातून शहरातील गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा, सुविधा द्या. तसेच त्यांच्यावर चांगले उपचार करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी केले.
महापालिकेच्यावतीने नव्याने सुरु केलेल्या तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रम भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेजवळ घेण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी बोलताना या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत नागरीकांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. यामुळे खाजगी दवाखान्यावर नागरिकांचा होणारा खर्च कमी होईल. नागरीकांना सर्व सेवा सुविधा या केंद्रामार्फत मिळणार असून शासनाच्या योजना चांगल्या पध्दतीने राबवा व नागरिकांना आपुलकीची वागणूक द्या. गरिबांना कोणताही पैशाचा खर्च न होता त्यांना ही सुविधा द्या, असे आवाहन करुन या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांला शुभेच्छा दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्था शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी विविध आरोग्य विषयक उपक्रम नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत 28 आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर केली आहेत. यापूर्वी मैत्रांगण, सानेगुरुजी वसाहत व महाभद्रा रेसिडेन्सी लक्षतीर्थ वसाहत येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. शनिवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.9 सदर बझार अंतर्गत भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेशेजारी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.10 सिध्दार्थनगर अंतर्गत अकबर मोहल्ला व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.11 मोरे माने नगर अंतर्गत प्रथमेश मंदिर सुर्वेनगर या ठिकाणी नवीन 3 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी 1 वैद्यकीय अधिकारी, 1 स्टाफ नर्स, 1 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, 1 अटेंडंट व 1 स्वच्छता कर्मचारी अशी पदे मंजूर आहेत. या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये प्राथमिक उपचार, गरोदर मातांची तपासणी, 0 ते 16 वयोगटातील मुलांचे लसीकरण व आवश्यकतेनुसार तज्ञ सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी मानले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त-2 पंडित पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता रमेश कांबळे, वैभव माने, सदर बझार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील व आरोग्यवर्धिनी केंद्र भोसलेवाडी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका व भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.