no images were found
जिल्ह्यातील प्रत्येक महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – अमोल येडगे
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रत्येक महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास शिल्पा पाटील, इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, अपर जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे आदी उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व लाभार्थ्यांचे अर्ज दाखल होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागात गाव निहाय तर शहरी भागात वॉर्ड निहाय योग्य नियोजन करुन अर्ज दाखल करुन घ्यावेत. लाभार्थी महिलांकडे अर्जासोबत जोडण्यासाठी उत्पनाचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला आदी कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल विभागाने योग्य मार्गदर्शन व सहकार्य करुन कागदपत्रे जलद उपलब्ध करुन द्यावीत. यासाठी गाव निहाय शिबीर आयोजित करावे. तसेच बँक खाते उघडून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यात बचत गटातील महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ प्राधान्याने मिळवून द्या. या योजनेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करा. उद्यापासून सर्व गावांमध्ये काम सुरु होण्यासाठी सर्व ग्राम विकास अधिकाऱ्यांनी चोख नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, योजनेच्या लाभासाठी “नारी शक्ती दुत” ॲपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी आणि त्यांची कुटुंबातील भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. अर्ज करताना लाभार्थी महिलांकडे उत्पनाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला ही कागदपत्रे लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने सहकार्य करावे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागात दवंडी व घंटा गाड्यांमार्फत जनजागृती करा.
तसेच गाव व वार्ड निहाय समित्या तसेच तक्रार निवारण समिती स्थापन करा. शिल्पा पाटील व सुहास वाईंगडे यांनी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.