no images were found
डॉ. आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. जगन कराडे यांना जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. जगन कराडे यांना नागपूर येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी कळविले आहे. येत्या रविवारी (दि. ३१ मार्च) सीताबर्डी- नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, छत्रपती संभाजीनगर येथील मिलींद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, नाटककार डॉ. सुनील रामटेके, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. विद्याधर बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
डॉ.कराडे यांचे राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर बारा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातील दोन ग्रंथ केंब्रीज स्कॉलर पब्लिकेशन, लंडन येथून प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. देशातील समाजशास्त्रज्ञांची शिखर संस्था असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (इंडियन सोशियॉलॉजीकल सोसायटी, नवी दिल्ली) ते सदस्य (२०१३- २०१९) तसेच सचिवपदीही (२०२०-२०२१) कार्य केलेले आहे. त्यांनी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), टोरोंटो (कॅनडा) व तैपेई (तैवान) येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. टोरोंटो आंतराराष्ट्रीय परिषदेत डब्ल्यूजी-०५ (फॅमिनियन अँड सोसायटी) या संशोधन समितीच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.