
no images were found
न्यू पॉलिटेक्निकला ‘मास्मा’चे सदस्यत्व
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकला महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (मास्मा) यांनी सदस्यत्व बहाल केले. प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांना मास्माचे राज्य संचालक नितीन कुलकर्णी यांनी सदस्यत्व प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी मास्माचे विभागीय संचालक अतुल होनोले, जिल्हा संचालक प्रदीप खाडे, जिल्हा समन्वयक धनाजी एकल, न्यू पॉलिटेक्निकमधील राजर्षी शाहू टेक सेंटरचे कार्यकारी अधिकारी प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, रजिस्ट्रार, प्रशासकीय अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
सोलर वॉटर हिटर व सोलर विद्युत पॅनेल उत्पादन, उभारणी, दुरूस्ती व तत्संबंधित मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्या व संस्थांची मास्मा ही राज्यस्तरीय संघटना आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार घरोघरी, व्यापार, व्यवसाय, उद्योग आदी क्षेत्रात सोलर यंत्रणांचा प्रसार व वापर वेगाने होण्यासाठी मास्मा स्वतंत्रपणे व राज्य विद्युत कंपनीसोबतही कार्यरत आहे. तसेच, ग्राहकांना सदर उत्पादने गरजेनुसार योग्य, दर्जेदार व किफायतशीर पुरवण्याचा त्यांचा कल आहे. या सदस्यत्वामुळे मास्माकडून न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सोलर उत्पादनांचे निर्मिती तंत्रज्ञान, कौशल्ये यांचे प्रशिक्षण दिले जाईल. डिप्लोमानंतर त्यांना नोकरी देण्याबरोबरच व्यवसाय उभारण्यात सहकार्य केले जाईल. न्यू पॉलिटेक्निककडून मास्मामधील उद्योगांचे तंत्रज्ञ व कर्मचारी यांना आवश्यक असे मुलभूत तंत्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.
‘सोलर उत्पादने निर्मिती करण्यासाठी न्यू पॉलिटेक्निकमधील प्रस्तावित राजर्षी शाहू टेक सेंटरचे काम सुलभ व गतिमान होण्यासाठी या सदस्यत्वाचा हातभार लागेल’ असे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी नमुद केले. त्याचवेळी मास्माचे राज्य संचालक नितीन कुलकर्णी म्हणाले ‘प्रिन्स शिवाजी ही संस्था व आम्हा सर्वांमध्ये महत्त्वाचा समान धागा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत. त्यामुळे मास्माकडून संस्थेस सर्वतोपरी सहकार्य राहील’.
या सदस्यत्वासाठी इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. सुभाष यादव यांनी आभार मानले.