no images were found
शिवरायांचा धर्मविषयक विचार सर्वसमावेशक : डॉ. बी. एम. हिर्डेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण लिखित “शिवरायांची धर्मनीती” या ग्रंथावर एकदिवसीय कार्यशाळेमध्ये बोलताना डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक उदारमतवादी राजे होते. सतराव्या शतकात असा राजा आपणाला इतिहासात दुसरा झालेला दिसत नाही. त्यांनी स्वधर्म रक्षणाबरोबरच इतर धर्मीयांविषयी त्यांचे धोरण सहिष्णू होते. स्वराज्य स्थापनेमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना त्यांच्या कर्तबगारीनुसार मोठमोठी पदे दिली. तसेच शिवाजी महाराजांचा धर्मविषयक विचार समजून घेण्यासाठी डॉ. इस्माईल पठाण यांचे ‘शिवरायांची धर्मनीती’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे आणि तरुण पिढीने त्याचे निश्चितपणे वाचन करावे, असे प्रतिपादन केले. लेखकाच्या मनोगतात डॉ. इस्माईल पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य अशा सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी जातीच्या आधारावर नाही तर कर्तबगारीच्या जोरावर अनेक सामान्य लोकांना महत्त्वाची पदे दिली. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहिली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकरी, स्त्रिया, सर्वसामान्य लॉक यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांचे धर्मविषयक धोरण हे सर्वव्यापी असे होते. त्यासाठी डॉ. पठाण यांचा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. अवनीश पाटील यांनी केले. तर आभार डॉ. दत्तात्रय मचाले यांनी मानले.