no images were found
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर : धनंजय महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत केंद्रीय मंत्री महोदयांचा सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण प्रवास होणार आहे. लोकसभेची नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे क्लस्टर्स तयार करण्यात आले आहे. नुकतीच दिल्ली याठिकाणी दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक संपन्न झाली यामध्ये मा.नरेंद्रजी मोदी यांनी भाजपाच्या सर्व नेते, पदाधिकारी यांना संबोधित करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्व इलेक्शन मोडमध्ये जाऊन कार्यरत राहणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीचा संदेश राज्य, जिल्हा आणि बूथ पर्यंतच्या कार्यकर्त्यांना पोचवण्यासाठी, सर्वांना चार्ज करण्यासाठी केंद्रीय मंत्री विविध लोकसभांच्या दौऱ्यावर आहेत.
या अनुषंगाने मा.शिवराजसिंह चौहान – (माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश) हे कोल्हापूर, हातकणंगले, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासासाठी शनिवार दिनांक २४/०२/२०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मध्य प्रदेशमध्ये मामा या नावाने प्रसिद्ध असणारे मा.शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेश येथील लोकप्रिय नेते असून सलग ४ वेळा ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पद मिळवलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या मध्ये प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपा युवा मोर्चा मध्ये प्रदेश सहसचिव, सरचिटणीस, युवा सचिव ते मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा संघटनात्मक प्रवास असून सध्या ते भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
मा.शिवराजसिंह चौहान हे या आपल्या दौऱ्यादरम्यान लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. दिवार लेखन (कमळ चिन्ह रेखाटन), चाय पे चर्चा, लाभार्थी संपर्क, प्रभावशाली व्यक्ती भेट, बुद्धीजीवी संमेलन, ऐतिहासिक स्थळांना भेटी त्याचबरोबर दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपा पदाधिकारी, वॉरीयर्स, बूथ अध्यक्ष यांच्याशी संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निवडणुकीसाठी हा त्यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या मार्फत त्यांच्या प्रवासाची तयारी करण्यात आली आहे. काल भाजपा जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली असून मा.शिवराजसिंह चौहान यांचा नियोजित दौरा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी धनंजय महाडिक, महेश जाधव, राजे समरजीतसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित देशमुख, निशिकांतदादा पाटील, संग्राम कुपेकर, अशोकराव माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नेत्यांची उपस्थिती होती.