
no images were found
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरी आयकरचा छापा
ठाणे : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या दुसऱ्या शिलेदारावर एकाच दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या दोन लोकप्रतिनिधींवर कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि मालमत्तांची पडताळणी सुरु असल्याची माहिती आहे. परंतु नेमक्या कोणत्या प्रकरणात सर्च ऑपरेशन सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुपारच्या सुमारास इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली. आता या धाडीत इन्कम टॅक्स विभागाच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने विचारेंवर कुठली कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याआधी, ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली होती. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकलेली. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठ वाजताच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घराची ईडीने झाडाझडती घेतली. वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते.