no images were found
खांडेकरांनी साहित्यातून समाजाला मूल्यविचार दिला – गोविंद काजरेकर
कोल्हापूर(प्रतिनिधी): खांडेकरांनी आपल्या साहित्यातून समाजाला मूल्यविचार दिला. असे प्रतिपादन गोविंद काजरेकर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आणि डॉ. अनंत व डॉ. लता लाभसेटवार प्रन्यास, प्रतिष्ठान अमेरिका पुरस्कृत वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत ‘खांडेकरांच्या साहित्यातील चिरंतन मूल्यविचार’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, खांडेकर हे जीवनवादी लेखक होते. त्यामुळे प्रांजळ जीवनदृष्टी त्यांच्या लेखनात पहावयास मिळते. माणूसकीची जपणूक करणारी पात्रं खांडेकरांनी साहित्यातून उभी केली. तसेच त्यांच्या साहित्यातून मध्यमवर्गीय जीवनजाणीवा प्रतिबिंबित झालेल्या दिसून येतात. खांडेकर हे सत्य, शिव आणि मांगल्याचे पूजक होते. ध्येयवाद आणि आदर्शवादाची त्यांनी मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. ते आपल्या
मनोगतात म्हणाले की, खांडेकरांचे सर्व साहित्य हे आजच्या पिढीने वाचले पाहिजे, आदर्शवत मूल्यांची जपणूक करावयाची असेल तर खांडेकरांच्या साहित्याकडे वळले पाहिजे. आजच्या पिढीने खांडेकरांच्या साहित्यातील मूल्यविचार अंगी बानवाला पाहिजे. या प्रसंगी अनंत लाभसेटवार यांनी आपल्या मनोगतामध्ये खांडेकर हे जागतिक पातळीवरचे साहित्यिक होते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले.
यावेळी डॉ.अनिल गवळी, डॉ. गोमटेश्वर पाटील तसेच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, एम. ए. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.