no images were found
शेतकऱ्यांनी चारा पिकांचे उत्पादन घेवून प्रगती साधावी – संतोष पाटील
कोल्हापूर : सध्या राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत चाऱ्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चारा पिकांचे उत्पादन घेवून प्रगती साधावी. त्याकरिता बियाणे उत्पादन कंपन्यांकडे मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. चारा पिकांची लागवड करण्याबरोबरच कमी पाण्यावर कमी कालावधीच्या चारा पिकांची लागवड करा, असे आवाहन करुन प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
जिल्हा परिषद कृषी समितीची माहे नोव्हेंबर 2023 ची मासिक सभा शुक्रवारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रब्बी हंगाम पीक परिस्थिती बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी माहिती दिली. सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, महाबीजचे व्यवस्थापक अभय आष्टनकर व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी स्वागत केले.
चारा पिकांचा आढावा घेऊन चारा पिकाखालील क्षेत्र वाढविण्याबाबत प्रचार प्रसिध्दी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. ते म्हणाले, नॅनो खतांबाबत नॅनो युरिया व नॅनो डिएपी या खतांच्या वापर, फायद्यांबाबत सोशल मिडियाचा वापर करुन प्रचार प्रसिध्दी करा. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सध्या युरिया 27443 मे.टन., डी.अे.पी.5720 मे.टन., एम.ओ.पी.4475 मे.टन संयुक्त खते 25541 मे.टन, एस.एस.पी. 9236 मे.टन एकूण 72415 मे.टन खत साठा उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शेतीतील विविध पिकांना वापरावयाच्या नॅनो खतांच्या वापरा अंतर्गत नॅनो युरिया व नॅनो डिअेपी या द्रवयुक्त खतांच्या वापराच्या प्रचार प्रसिध्दी बाबत महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर व इफको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात चित्ररथ व दृकश्राव्य माध्यमातून दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक गावोगावी द्रवयुक्त नॅनो खतांच्या वापराबाबतची माहिती देण्याबाबतच्या दृकश्राव्य चित्ररथाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत फित कापून व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.