
no images were found
माधुरी दीक्षितचा नवा सिनेमा येणार नवीन वर्षात
पुणे :माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या ‘आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स’ निर्मित ‘पंचक’ या मराठी चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. हा चित्रपट नव्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानं पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट पटकथेसाठी परीक्षकांचं पारितोषिक मिळवलं. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, संपदा जोगळेकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी आणि आशिष कुलकर्णी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.
‘पाच विशिष्ट नक्षत्रांच्या कालावधीला पंचक असे म्हटले जाते. यात शुभ किंवा अशुभ घडले, की ते पाचपटींनी वाढते. अशीच घटना या चित्रपटात घडते. या घटनेनंतर कोकणातल्या एका कुटुंबातील पात्रांचा भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक चढउताराचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात काम करणं हा अतिशय सुंदर अनुभव होता. निर्मात्यांमध्ये माधुरीमॅम आणि राम सर असल्यानं टीमनं खूप धमाल करीत या चित्रपटाचं चित्रीकरणं केलं, अशी आठवण अभिनेता आदिनाथ कोठारेनं सांगितली. चित्रपटाविषयी निर्माती-अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि निर्माते डॉ. श्रीराम नेने म्हणाले, ‘या चित्रपटाची कथा ऐकल्यावरच निर्मितीसाठी अत्यंत उत्सुक होतो. हा चित्रपट प्रासंगिक विनोद आणि ब्लॅक कॉमेडीचं मिश्रण आहे.’
काही दिवसांपूर्वी दसऱ्याच्या निमित्ताने माधुरीने या सिनेमाची रीलिज डेटची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडिओ पोस्टनुसार ‘पंचक’ ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
दरम्यान माधुरी दीक्षितच्या मराठीतील कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने २०१८ साली आलेल्या ‘बकेटलिस्ट’ या मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय मराठी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांनाही माधुरी अनेकदा उपस्थित असते. हिंदी रिअॅलिटी शोमध्येदेखील ‘धक धक गर्ल’ तिचा मराठमोळा लूक फ्लाँट करायला विसरत नाही.