no images were found
तेजस्विनी पंडितने सांगितलं तिच्या पहिल्या क्रशचं नाव
मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नाव घेतलं जातं. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात तेजस्विनीने शूर्पनका ही भूमिका साकारली होती. नवरात्र उत्सवानिमित्त अभिनेत्रीने अलीकडेच लोकमत फिल्मीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
तेजस्विनी पंडितला या मुलाखतीत तिच्या पहिल्या ऑडिशनबद्दल विचारण्यात आलं. अभिनेत्रीने एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीसाठी पहिली ऑडिशन दिली होती. याबद्दल ती म्हणाली, “साधारण ३० ते ३७ मुलींमधून पहिल्याच झटक्यात माझी निवड करण्यात आली. त्यापूर्वी मी इंडस्ट्रीत अजिबात काम केलं नव्हतं. तरीही पहिल्याच झटक्यात माझी निवड झाली. त्यावेळी थेट अंकुश चौधरीबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली.”
तेजस्विनी पुढे म्हणाली, “तेव्हा अंकुश सरांबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी माझ्याकडे एक टोपी होती त्यावर मी त्यांची सही घेतली होती. ती टोपी मी प्रचंड मिरवली.”
“माझ्या बऱ्याच मुलाखतींमध्ये मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आता अंकुशला सुद्धा माहिती असेल की, माझा अंकुश चौधरींवर पहिला आणि मेजर क्रश होता. त्यानंतर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली…मग एकदमचं छान वाटलं.” असं तेजस्विनीने सांगितलं.
दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. लवकरच ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. यापूर्वी ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्चा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तेजस्विनीने भूमिका साकारल्या आहेत.