no images were found
कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा
कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला.
कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
झालेल्या दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.
तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी सोने लुटल्यानंतर बंदुकीच्या फैरी झडताच उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोने व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळयास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील -भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, संजय पाटील, योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, दसरा महोत्सव समितीचे ऋतुराज इंगळे, विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, ऍड.राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते आदींसह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.
भव्य मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष- सजवलेले हत्ती, उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, आदित्य बेडेकर, अजेय दळवी, ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी, वासिम सरकवास, आनंद काळे, जयदीप मोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी केले. नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी दसरा चौकात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.