
no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन,
कोल्हापूर, : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच राज्यभरातील ग्रामीण भागातील या कौशल्य विकास केंद्रांच्या ठिकाणी त्या-त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत महसूल विभागातील विभागीय महसूल अधिकारी, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठाधिकारी, केंद्रांचे समन्वयक तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करवीर तालुक्यातील उंचगाव येथे खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी हे उपस्थित होते. जिल्ह्यात सर्वच 21 ग्रामपंचायतीमध्ये माननीय खासदार, माननीय आमदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित होते.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामध्ये 18 ते 45 वयोगटातील युवक युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण प्रशिक्षण केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे याप्रमाणे आहेत. आजरा तालुक्यातील आजरा व उत्तूर, भुदरगड तालुक्यातील गारगोटी व मडिलगे, चंदगड तालुक्यातील चंदगड व माणगाव, गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव व महागाव, गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा, हातकणंगले तालुक्यातील कबनूर, पुलाची शिरोली, कागल तालुक्यातील कापशी, कसबा सांगाव, करवीर तालुक्यातील उचगाव, पन्हाळा तालुक्यातील कोडोली व कळे, राधानगरी तालुक्यातील राधानगरी व राशिवडे बुद्रुक, शाहुवाडी तालुक्यातील सरूड व शित्तूर तर्फ वारुण व शिरोळ तालुक्यातील लाट या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.