no images were found
राहुल गांधींच्या कुत्र्यामुळे AIMIM नेत्याची थेट कोर्टात धाव
नवी दिल्ली : देशभरात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना सुरुवात होईल. त्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रीय पातळीवर पक्ष आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. यामध्ये नेतेमंडळींचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रीय नेत्यांमध्ये आरोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एमआयएमच्या नेत्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधींच्या कुत्र्यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
४ ऑक्टोबरला जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधींनी त्यांच्या आई अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक भेट दिली. त्यासाठी त्यांनी खास गोव्याहून नूरी नावाचं एक कुत्र्याचं पिल्लू आणलं आणि सोनिया गांधींना भेट म्हणून दिलं. सोनिया गांधीही पिल्लाला पाहून खूश झाल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. “नूरी…कुटुंबातील सर्वात नवीन सदस्य” अशा मथळ्याखाली हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.
दरम्यान, या कुत्रीचं नाव ‘नूरी’ ठेवल्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. एमआयएम पक्षानं या मुद्द्यावरून तीव्र आक्षेप घेतल्यानंतर आता त्याविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली आहे. “राहुल गांधींचं हे कृत्य निषेधार्ह व लाजिरवाणं आहे. कुत्रीला नूरी नाव देऊन गांधी परिवाराने मुस्लीम समाजातील मुलींचा अवमान केला आहे. तसेच, मुस्लीम मुली व मुस्लीम समाजाबाबत गांधी परिवाराची नकारात्मकताही दिसून येते” अशी टीका एमआयएमचे उत्तर प्रदेशातील नेते मोहम्मद फरहान यांनी केली आहे.
दरम्यान, न्यायालयात राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करताना मोहम्मद फरहान यांनी या नावाचा पवित्र कुराणमध्येही समावेश असल्याचा उल्लेख केला आहे. “नूरी हे नाव मुस्लीम धर्माशी संबंधित असून त्याचा उल्लेख कुराणमध्येही आहे. आम्ही राहुल गांधींविरोधात या कृत्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली आहे. राहुल गांधींच्या यूट्यूब व फेसबुकवरून आम्हाला ही माहिती मिळाली”, अशी प्रतिक्रिया फरहान मोहम्मद यांनी दिली आहे.