
no images were found
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी अन्यथा..”, मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी कारण ते हिंसा घडवतील अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावात घेतलेल्या सभेत उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ते असं बोलू शकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आज आंदोलन स्थळी आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंत आपलं भाषण सुरु केलं. आंदोलन घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“त्याला (गुणरत्न सदावर्ते) यश मिळवायचं होतं तेव्हा त्याने एक मराठा लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आले आहेत, त्यांचं भलं होतंय तर सांगतो मी हिंसा घडवणार आहे. तुम्ही मला सांगा आता मला अटक करणं हे इतकं सोपं आहे का? मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जाणारा तूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला (गुणरत्न सदावर्ते) समज द्यावी. तो तुमचा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं सांगणं आहे तो तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही मराठ्यांना अंगावर घेऊ नका. याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत हे विसरु नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना माजी विनंंती आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. ते त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगावर घालत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि फडणवीसांना मी सांगतोय की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या हेच कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करायचा त्यांनी (देवेंद्र फडणवीस) बंद करावं. मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येतो. असं मनोज जरांगे पाटील यांनी आज झालेल्या आंतरवली सराटीतल्या भाषणात म्हटलं आहे.
मराठा भावांना मी सांगू इच्छितो, आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. आपण २२ ऑक्टोबर रोजी पुढची दिशा ठरवणार आहोत. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारकडे मुदत आहे. आपलं आंदोलन शांतेत होईल हे मी तुम्हाला सांगतो पण आरक्षणही तुम्हाला मिळणार. शांततेच्या आंदोलनामुळेच मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा २२ तारखेला ठरवणार. आज सरकारला विनंती आहे की लाखांनी जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल. असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.