
no images were found
कोल्हापूर येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
कोल्हापूर, -धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॉक्टिशनर बार असोसिएशन व कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांचे संयुक्त विद्यमाने धर्मादाय संघटनेतर्फे रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी, ताराराणी विद्यापीठ व्ही.टी. पाटील हॉल, राजाराम रोड येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व रोग निदान महा-आरोग्य शिबीराचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी दिली आहे.
या शिबीरामध्ये नेत्ररोग, दंतविकार, त्वचारोग, न्युरो, एचआयव्ही, ह्दयरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, कान नाक घसा, ऑर्थोपेडिक, किडनी, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक विभाग आदी सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. शिबीरामध्ये कोल्हपूर शहर आणि जिल्ह्यातील 18 हॉस्पिटल, सांगली 22 हॉस्पिटल, रत्नागिरी 5 हॉस्पिटल व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 3 हॉस्पिटल सहभागी होणार आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील सर्व धर्मादाय रुग्णालयांचे पथक शिबीरात आरोग्य तपासणी करणार आहेत.
शिबीराचा उद्देश हा कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील गरीब व दुर्बल घटकातील लोकांनी महागड्या उपचारांकरिता मुंबई, पुणे सारख्या शहरात दूर न जाता कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्येच विविध प्रकारच्या रुग्ण सेवा उपलब्ध करुन देणे हा आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांबद्दल व त्यांच्या रुग्णसेवेबद्दल एकाच छताखाली माहिती पुरविणे हा आहे. या शिबीराची जय्यत तयारी सुरु असून ते मोफत आहे. या सर्व रोगनिदान महा-आरोग्य शिबीराचा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त विभागातर्फे श्रीमती पवार यांनी केले आहे.
या महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक केसरकर पालकमंत्री तथा मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हसन मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य, धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन तसेच स्थानिक खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.