no images were found
शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान किल्ले रायगडावर दोन तरुणांचा मृत्यू
रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या दोन तरुणांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
बेळगावजवळच्या संकेश्वर येथील ओंकार दीपक भिसे (१९) याचा २ जून रोजी तर, पुणे येथील प्रशांत गुंड (२८) याचा ४ जून रोजी रायगडावर मृत्यू झाला.
यासाठी त्यांनी महाड उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे .या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले. या समितीने जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करायचा आहे.
महाड उपविभागीय दंडाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यामार्फत ही चौकशी होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महाड येथे घेतलेल्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली होती का, याबाबत त्या चौकशी करणार आहेत.
याशिवाय, संबंधितांचे म्हणणे दाखल करून घेणे, या घटना कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांची चूक अथवा हलगर्जीमुळे घडल्या की हा अपघात होता याबाबत निरीक्षण नोंदविणे व या घटनेचा चौकशी अहवाल स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत.