no images were found
राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला
मुंबई: राज्यासह संपूर्ण देशभरात मध्यंतरी करोनाची साथ पूर्णपणे ओसरली होती. मात्र, आता करोनाच्या XBB1.16 या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. कोविड साथीच्या काळात महाराष्ट्र हे करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या प्रमुख राज्यांपैकी एक होते. परंतु, महाराष्ट्रात योग्य नियोजनामुळे कोविडची परिस्थिती नियंत्रणात आली होती. परिणामी करोनाच्या बाबतीत नागरिक बरेच निर्धास्त झाले आहेत. परंतु, आता महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे.
काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये बहुतांश जण हे XBB 1.16 ची लागण झालेले आहेत. मंगळवारचा दिवस हा महाराष्ट्राच्यादृष्टीने चिंता वाढवणारा ठरला. कारण राज्यात सोमवारी २०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर मंगळवारी नव्या करोना रुग्णांचा आकडा ४५० इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे एकाच दिवसात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. ही गती कायम राहिल्यास राज्यात पूर्वीसारखी भयानक परिस्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. कोविडच्या XBB 1.16 व्हेरिएंटमुळे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी सहव्याधी असलेल्या रुग्णांना करोनाची लागण होणे, चिंताजनक ठरू शकते. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने एकेकाळी देशातील कोविडचा मुख्य हॉटस्पॉट ठरलेली मुंबई अलर्ट मोडवर गेली आहे.