
no images were found
बँकांनी ‘झिरो पेंडन्सी‘ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्चअखेर निकाली काढावीत -जिल्हाधिकारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्च अखेर निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बॅंक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक हेमंत खेर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, आरबीआयचे वित्तीय समावेशन विभागाचे व्यवस्थापक विजय कोरडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)चे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे, आरसेटी (ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था) चे कुलभूषण उपाध्ये तसेच जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक व विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या व महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी मार्च 2023 अखेर वार्षिक पतपुरवठा आराखड्याबरोबरच शासकीय व महामंडळांच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करावी. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून त्याचप्रमाणे पीक कर्जासहित कृषी क्षेत्राची उद्दिष्टपूर्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व बँकर्समध्ये शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणांबाबत जागृतता निर्माण होण्यासाठी सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक व कर्ज वाटप अधिकाऱ्यांसाठी तालुकानिहाय कार्यशाळा आयोजित करावी. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेले शासकीय विभाग, महामंडळे अथवा बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना नोटीस बाजवण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेला केल्या. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2022-23 साठी वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट 17 हजार 980 कोटी रुपयांचे देण्यात आले होते, यात 20 हजार 948 कोटींची (117 टक्के) उद्दिष्टपूर्ती डिसेंबर 2022 अखेर झाली आहे, याबद्दल सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कौतुक केले.