no images were found
बदली होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यातील ५२ शिक्षकांनी दिव्यांग असलेले खोटे प्रमाणपत्र जोडले
बीड : आहे त्याच शाळेत नोकरी राहावी, बदली होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यातील ५२ शिक्षकांनी दिव्यांग असलेले खोटे प्रमाणपत्र जोडले होते. चौकशीअंती हा बनाव उघड झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर त्यांच्यावर दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
३५६ शिक्षकांची मेडिकल पथकाद्वारे तपासणी केली. २०० संशयास्पद होते. त्यांना अंबेजोगाई मेडिकल कॉलेजला रेफर केले. त्यातील १४८ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. ५२ शिक्षक दोषी आढळून आले. त्यांना याबाबत विचारण्यात आलं. हे सर्व नोकरीवर येताना खुल्या प्रवर्गातून आले होते. त्यानंतर त्यांनी बीड शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी अपंगाचे दाखले घेतले. या ५२ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली.
शासनाकडून त्यांनी वाहन खरेदी केले आहे. याशिवाय आयकरात सुट घेतली आहे. सोमवारपर्यंत काय कारवाई करता येईल, यासाठी विभागीय चौकशी होणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असंही झेडपी सीईओ यांनी सांगितलं. २०० पैकी साधारणतः ५० जणांना अहवाल यायचा आहे. आणखी २० ते २५ जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वाहन भत्ता घेतला आहे. शिवाय आयकरात सुट घेतली आहे. या सर्व रिकव्हरी करणार असल्याचंही ते म्हणाले. विभागीय चौकशी झाल्याशिवाय कायदपत्राची सत्यता कळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारे होणार्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्प्यात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात १५७२ शिक्षक पात्र होते. यातील ७९४ शिक्षकांनी आपण संवर्ग एकमध्ये बसल्याबाबतचे अर्ज केले. संवर्ग एकमध्ये गंभीर आजारी, दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे. आपली बदली होवू नये किंवा हवी ती शाळा मिळावी, यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने सीईओ अजित पवार यांनी संबंधित शिक्षकांची सुनावणी घेतली.
यात ३३६ दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीसा देवून त्यांची झेडपीत १४ डिसेंबर रोजी तपासणी करण्यात आली. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत व दिव्यांगत्वाच्या टक्केवारीबाबत सदर तपासणीमध्ये पथकातील वैद्यकीय अधिकार्यांनी पुनर्तपासणी आवश्यक असल्याचे मत नोंदविले. अशा ३३६ शिक्षकांना पुनर्तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामनंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठातांकडे (अपंग मंडळापुढे) सीईओंनी पाठविले. यातील शिक्षक, त्यांचे पाल्य, नातेवाईक ज्यांनी अपंग मंडळ, अंबाजोगाई येथे दिव्यांग प्रमाणपत्रानुसार वैद्यकीय तपासणी करुन घेतली. ऑनलाईन बदली प्रक्रियेच्या अर्जासोबत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये व स्वारातीने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली.