no images were found
दोन्ही प्रियकरांनी काढला तरुणीचा काटा
पुणे (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३० वर्षीय महिलेची दुहेरी प्रेम संबंधातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या खुनाचा तपास मावा पुडी आणि बारकोडच्या आधारे लावला आहे.
यादव (वय ३०, सध्या रा. माताजीनगर एम.आय.डी.सी नागापूर, मूळ रा. बिहार) या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणात शुभम मनोज गुळसकर (वय २२, रा. बोल्हेगाव अहमदनगर), मिथीलेश डोमी यादव (रा. एम. आय. डी. सी वडगाव कांदळी ता. जुन्नर मूळ रा. बिहार) यांना अटक करण्यात आली असून चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे एका शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. प्राथमिक पोलिस तपासात तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता, शुभम गूळसकर आणि मिथिलेश या दोघांचे एकाच महिलेसोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली. पोलिसांना घटनास्थळवरून मिळालेली माव्याची पुडी फक्त अहमदनगर येथेच मिळते, तर मृत महिलेच्या अंगावरील ओढणीवर सुविधा सुपर मार्केटचे नाव आढळले.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित म्हणून पोलिसांनी शुभम याला ताब्यात घेतले. सुरुवातीला मी खून केला नाही असं म्हणणाऱ्या शुभमने पोलिसांनी खाक्या दाखवताच आपण मिथलेशच्या मदतीने महिलेचा गळा आवळून खून केल्याचे त्याने सांगितले. शुभम गुळसकर व मिथीलेश यादव या दोघांचे महिलेसोबत एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही महिला वारंवार आरोपींकडे पैशांची मागणी करून मानसिक त्रास देण्याचे काम करत होती. या प्रकाराचा दोघांनाही कंटाळा आला होता. त्यावर या दोन आरोपींनी एकमेकांच्या मदतीने १२ जानेवारीला महिलेला अहमदनगर येथून सायंकाळच्या सुमारास वडगाव कांदळीला नेले. त्यानंतर दोघांनी तिच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून खून केला आहे. कोणताही पुरावा नसताना फक्त मावा पुडी आणि बारकोडच्या स्टिकर वरून पोलिसांनी या खुनाचा तपास लावला आहे.