no images were found
गस्तीवर असताना LOCजवळ खोल दरीत कोसळून ३ लष्कराचे जवान शहीद
कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ बर्फाळ भागात गस्त घालत असताना भारतीय लष्करातील ३ जवान खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिन्ही जवान शहीद झाले. तिघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. नायब सुभेदार परषोतम कुमार, हवालदार अम्रिक सिंह, शिपाई अमित शर्मा अशी त्यांची नावे आहेत.
शहीद झालेल्यांमध्ये १ जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) आणि दोन ओआर आहेत. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सकडून दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आणि दोन ओआर (अन्य रँक) यांचा समावेश असलेल्या पथकावर बर्फ कोसळला. पथकातील तिनही जवान खोल दरीत कोसळले. यात ते शहीद झाले. एएनआयने दिलेल्या ट्विटनुसार, नायब सुभेदार परषोतम कुमार, हवालदार अम्रिक सिंह, शिपाई अमित शर्मा अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. तसेच, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. हिमस्खलनात तीन जवान शहीद झाले होते. अल्मोडा चौकीजवळ हिमस्खलनात ५६ आरआरचे तीन जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले होते