no images were found
दिव्यांगांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील – अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर : दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा साहस संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हूरजूक, विजय काणेकर, नंदकुमार फुले, स्नेहल चौगुले, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग विभागाच्या साधना कांबळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या समन्वयक स्वाती गोखले, उद्योगपती रोहित पाटील, उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींनी मिळालेल्या साहित्याचा उपयोग करुन आपल्या जीवनात प्रगती साध्य करावी, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची संख्या निश्चत करण्यावर भर देण्यात येईल. यामुळे त्यांना आवश्यक त्या सुविधा देणे सोयीस्कर होईल.
सामाजिक कार्यकर्त्या नसीमा हूरजूक म्हणाल्या, दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरुन त्यांच्यापर्यंत आवश्यक साधने पुरवता येतील.जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांगाना सहकार्य करण्यात येईल, असे साधना कांबळे यांनी सांगितले. दिव्यांगांसाठीचे अनुदान लवकरात लवकर मिळावे, अशी अपेक्षा स्वाती गोखले यांनी व्यक्त केली. यावेळी दिव्यांग व्यक्तींना श्रवण यंत्र, कुबड्या, वॉकरचे वाटप करण्यात आले व कॅलीपर्सचे मोजमाप करण्यात आले.