no images were found
विद्यापीठ संघाची राज्य क्रीडा महोत्सवातील कामगिरी कौतुकास्पद
गुणगौरव सोहळ्यात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे उदगार
कोल्हापूर : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडलेल्या२४ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ”क्रीडा महोत्सव – २०२२’ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने केलेली कामगिरी कौतुकास्पदच आहे. तथापि, एवढ्यावरच समाधान न मानता प्रादेशिक व राष्ट्रीय अशा पुढील टप्प्यांवर कामगिरी अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
औरंगाबाद येथे दि. ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत २४ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ”क्रीडा महोत्सव – २०२२’ पार पडला. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २२ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा १२० खेळाडूंचा संघ सहभागी झाला. सर्व खेळाडूंनी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या व मुलांच्या संघांनी दोन्ही गटात प्रथमच सर्वसाधारण विजेतेपद मिळवून इतिहास घडविला. त्याचप्रमाणे सर्व गटांत (ओव्हरऑल) सर्वसाधारण विजेतेपदाच्या क्रमवारीतही तृतीय स्थान प्राप्त केले. या संघातील खेळाडूंचा गुणगौरव सोहळा आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे अशा स्पर्धांतून आपल्यापेक्षा अधिक चांगल्या खेळाडूंची कामगिरी पाहून त्यापासूनही शिकण्याची आणि स्वतःत सुधारणा करण्याची तयारी खेळाडूंनी दाखविली पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी केले, तर डॉ. लीना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी आभार मानले. मंचावर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
२४ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ”क्रीडा महोत्सव – २०२२’मधील शिवाजी विद्यापीठ संघाची कामगिरी पुढीलप्रमाणे-मैदानी स्पर्धेत १० सुवर्ण, ४रौप्य आणि 4 कांस्य पदके मिळवून शिवाजी विद्यापीठ ॲथलेटिक्स मधील जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला. निखिल पाटील – 100 मीटर सुवर्ण, इंद्रजित फराकटे – 1500 मीटर सुवर्ण, रोहिणी पाटील – 1500 मीटर सुवर्ण, सुशांत जेधे – 5000 मीटर सुवर्ण, श्रावणी देसावले – उंच उडी सुवर्ण, प्रफुल्ल थोरात – थाळीफेक रौप्य, प्राजक्ता शिंदे – 5000 मीटर रौप्य, सिध्दी कारंडे थाळीफेक कांस्य, प्रतिक पाटील – 100 मीटर कांस्य, सत्यजीत पुजारी – 1500 मीटर कांस्य सिध्दी कारंडे – गोळाफेक कांस्य, सुशांत जेधे – 5000 मीटर सुवर्ण, प्रफुल्ल थोरात -शॉटपुट सुवर्ण, शुभम जाधव – भालाफेक सुवर्ण, निखिल पाटील, वल्लभ पाटील, तुषार काळुखे, अक्षय पाटील – 4 X 100 मीटर रिले सुवर्ण, श्रेया मुळीक, रिया पाटील, संपदा धुमाळ, राधा मगर – 4 X 100 मीटर रिले रौप्य,
सांघिक खेळामध्ये कबड्डी पुरूष व बास्केटबॉल महिला संघाने रौप्य पदक प्राप्त केले. खो-खो महिला व पुरूष तसेच बास्केटबॉल पुरूष या तिन्ही संघ कांस्य पदकाचे मानकरी ठरले. महिला व पुरूष दोन्ही गटामध्ये द्वितीय क्रमांकावर जनरल चॅम्पियनशिप आणि ओव्हर ऑल जनरल चॅम्पियनशिप मध्ये तृतीय क्रमांक संपादन करुन उत्तुंग असे यश विद्यापीठाच्या संघाने मिळविले. सदर संघासोबत २० संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक गेले होते.
ॲथलेटिक्स जनरल चॅम्पियनशिप (महिला)- 1- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -47 गुण, 2- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे -34 गुण, 3-मुंबई विद्यापीठ, मुंबई -28 गुण, ॲथलेटिक्स जनरल चॅम्पियनशिप (पुरूष)- 1- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 63 गुण, 2- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे -24 गुण, 3- मुंबई विद्यापीठ, मुंबई -18 गुण, ओव्हरऑल जनरल चॅम्पियनशिप–1- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – 240 गुण, 2. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 220 गुण, 3. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 190 गुण, 4- मुंबई विद्यापीठ, मुंबई -130 गुण.